अमेरिकेत जळगावच्या अर्णव सराफ यांचे निधन
जळगाव : येथील मूळजी जेठा महाविद्यालयातील प्राध्यापिका शमा सराफ व जैन उद्योग समूहातील निवृत्त अधिकारी सुबोध सराफ यांचे सुपुत्र अर्णव सराफ (वय २६) यांचे दु:खद निधन झाले.
अर्णव हे गेल्या दोन वर्षांपासून अमेरिकेत वास्तव्यास होते. तेथील वेळेनुसार सायंकाळी सुमारे ६ ते ७ दरम्यान (भारतीय वेळेनुसार सकाळी ११ वाजता) त्यांचे निधन झाले. अमेरिकेतील तीव्र थंडी सहन न झाल्याने रक्तदाब अत्यल्प झाल्यामुळे अर्णव यांचे निधन झाल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली.

या दु:खद घटनेनंतर सुबोध व शमा सराफ हे मुंबईहून अमेरिकेकडे रवाना झाले असून अर्णव यांच्यावर तेथेच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
अर्णव यांच्या पश्चात आई-वडील व भाऊ असा परिवार आहे. सुबोध व शमा सराफ हे जळगावातील सामाजिक चळवळीत नेहमीच अग्रभागी असून रोटरी क्लबच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. तसेच सुबोध सराफ हे प्रसिद्ध कलाकार व चित्रकार म्हणूनही परिचित आहेत. अर्णव यांच्या निधनाचे वृत्त समजताच नातेवाईक, मित्रपरिवार व परिचितांनी जळगाव येथील त्यांच्या निवासस्थानी धाव घेऊन शोकसंवेदना व्यक्त केल्या.