DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

‘पीस वॉक’ने जळगावकरांची नवीन वर्षाची पहाट सकारात्मक ऊर्जेने उजळली

गांधी रिसर्च फाऊंडेशनचा उपक्रम चौथ्या वर्षात

जळगाव : गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या वतीने नवीन वर्षाचे स्वागत ‘पीस वॉक’ या प्रसन्न, आनंददायी व सकारात्मक ऊर्जेचा अनुभव देणाऱ्या उपक्रमातून करण्यात आले. जैन उद्योग समूहाच्या जैन व्हॅली येथील नक्षत्र गार्डन परिसरात निसर्गरम्य वातावरणात हा उपक्रम पार पडला.

साडेतीन किलोमीटरच्या या वॉकदरम्यान पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश या पंचमहाभूत तत्त्वांचा मानवी जीवनाशी असलेला संबंध वैज्ञानिक तसेच आध्यात्मिक दृष्टिकोनातून उलगडून सांगण्यात आला. निसर्गातील पंचमहाभूत तत्त्वे मानवाला उपलब्ध करून देणाऱ्या सृष्टीप्रती सदैव कृतज्ञता बाळगावी, असे आवाहन गांधी रिसर्च फाऊंडेशनचे प्रा. डॉ. अश्विन झाला यांनी केले.

कबीरांचे दोहे, संतवचने तसेच सुप्रसिद्ध व्यक्तींच्या विचारांच्या उदाहरणांतून त्यांनी मानवी शरीराचा पंचतत्त्वांशी असलेला अतूट संबंध विशद केला. या पीस वॉकमुळे जीवनातील शांतीचा सुखद अनुभव मिळाल्याची भावना सहभागी नागरिकांनी व्यक्त केली. अशा प्रकारच्या पीस वॉकचे नियमित आयोजन व्हावे, तसेच भविष्यात जीवनाशी निगडित विविध विषयांवर हे उपक्रम राबवावेत, अशा सूचनाही त्यांनी केल्या. या पीस वॉकमध्ये डॉ. सुहास गाजरे, डॉ. विकास गीते, नितीन अट्रावलकर, सुनील चौधरी, अनिल गडे, दीपक चौधरी, अरविंद पाटील, स्वप्नील भोई, मिलिंद खारुळ, महेश शिंपी, विनया कुलकर्णी, उल्हास सुतार, दीपक मिश्रा, संस्थेचे समन्वयक उदय महाजन यांच्यासह एकूण ३३ स्त्री-पुरुष व मुलांचा सहभाग होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक परीक्षा नियंत्रक गिरीश कुळकर्णी यांनी केले तर आभारप्रदर्शनही त्यांनीच केले.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.