“क्षणिक अमिषाला नकार, विकासाला होकार : योगेश हिवरकर”
जळगाव : महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ साठी मतदानाची प्रक्रिया लवकरच पार पडणार असून, या पार्श्वभूमीवर जळगावकरांनी सजग, विचारपूर्वक आणि जबाबदारीने मतदान करावे, असे आवाहन प्रभाग क्रमांक २ (ड) मधील आम आदमी पार्टीचे अधिकृत उमेदवार योगेश दत्तात्रय हिवरकर यांनी केले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून जळगाव शहरातील मूलभूत प्रश्न प्रलंबित असून, रस्त्यांची दुरवस्था, अनियमित पाणीपुरवठा, कचऱ्याचे ढीग, अपुरी स्ट्रीट लाईट व्यवस्था, महिला व बालसुरक्षेचा प्रश्न यामुळे नागरिक त्रस्त आहेत. अशा परिस्थितीत केवळ आश्वासनांवर नव्हे, तर प्रत्यक्ष काम करणाऱ्या आणि जबाबदारी स्वीकारणाऱ्या प्रतिनिधीची निवड करण्याची वेळ आली आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
योगेश हिवरकर हे गेल्या १५ वर्षांपासून कोणत्याही पदाशिवाय जळगाव शहरातील विविध समस्यांवर सातत्याने काम करत आहेत. प्रशासनाशी पत्रव्यवहार, आंदोलने, जनजागृती, फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून प्रश्न मांडून अनेक ठिकाणी ठोस उपाययोजना त्यांनी करून घेतल्या आहेत. कोरोना काळात गरजू कुटुंबांना मदत, परप्रांतीय मजुरांना मायदेशी पाठविणे, रस्ते, गटारी, स्वच्छता, उद्याने, प्रदूषण नियंत्रण यांसारख्या विषयांवर त्यांनी केलेले काम नागरिकांच्या लक्षात आहे.
विशेष बाब म्हणजे, योगेश हिवरकर हे लोकवर्गणीतून उभे राहिलेले उमेदवार आहेत. कोणत्याही मोठ्या आर्थिक पाठबळाशिवाय, सर्वसामान्य नागरिकांनी ५०, १०० रुपयांच्या छोट्या योगदानातून त्यांची निवडणूक लढवण्यासाठी आतापर्यंत सुमारे ६० ते ७० हजार रुपये वर्गणी स्वरूपात जमा केली आहे. ही बाब नागरिकांचा त्यांच्यावरील विश्वास आणि स्वच्छ राजकारणाला मिळणारे समर्थन दर्शवते.
मतदानाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, “मतदान हे केवळ एक बटन दाबण्यापुरते मर्यादित नसून ते आपल्या कुटुंबाच्या, मुलांच्या आणि शहराच्या भविष्यासाठी घेतलेला निर्णय आहे. क्षणिक प्रलोभन, अमिष किंवा पैशांच्या बदल्यात दिलेले मत उद्या आपल्या प्रश्नांसाठी उभे राहणार नाही.
”ते पुढे म्हणाले की, “मी स्वतःला नेता नव्हे, तर जनतेचा सेवक मानतो. माझ्याकडे मोठे पैसे नसतील, पण नागरिकांचे दुःख समजून घेणारे हृदय आणि प्रामाणिकपणे काम करण्याची इच्छाशक्ती आहे. एक संधी दिल्यास प्रभाग क्रमांक २ (ड) हा आदर्श विकासाचा नमुना करून दाखवेन.”
या निवडणुकीत मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करून लोकशाहीचा उत्सव साजरा करावा आणि स्वच्छ, सुरक्षित व विकासाभिमुख जळगावसाठी योग्य उमेदवाराची निवड करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.प्रभाग क्रमांक २ (ड) मधील मतदारांनी “झाडू” या निवडणूक चिन्हासमोरील बटन दाबून स्वच्छ राजकारणाला बळ द्यावे, असेही आवर्जून सांगण्यात आले आहे.

मुलाखत