जळगाव महापालिकेत समिती नियुक्तीचा मार्ग मोकळा
जळगाव : जळगाव शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२६ नंतर महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजाला आता वेग येण्याची चिन्हे दिसत आहेत. महापौर दिपमाला मनोज काळे यांनी स्थायी समिती तसेच महिला व बालकल्याण समितीवरील सदस्यांच्या नियुक्तीसाठी बुधवार, ११ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता विशेष बैठक बोलावली आहे.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम २० (२) नुसार नवनिर्वाचित सदस्यांमधून स्थायी समितीची रचना करण्याबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे. तसेच महिला व बालकल्याण समितीवर सदस्यांचे नामनिर्देशन करण्यासाठी कलम ३१ (३) उपकलम (२) आणि कलम ३० (१अ) व (२) मधील तरतुदींनुसार निर्णय घेतला जाणार आहे.

सभागृहातील विविध राजकीय पक्षांच्या संख्याबळाचा विचार करून समित्यांवरील सदस्यांची नियुक्ती निश्चित केली जाणार आहे. या बैठकीसाठी उपमहापौर मनोज सुरेश चौधरी यांच्यासह भाजपचे गटनेते प्रकाश रावलमल बालानी, शिवसेनेचे विष्णू रामदास भंगाळे, शिवसेना (उबाठा) गटाचे इब्राहीम मुसा पटेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रफुल्ल गुलाबराव देवकर यांना निमंत्रित करण्यात आले आहे. महानगरपालिकेच्या आगामी कामकाजाच्या दृष्टीने स्थायी समिती आणि महिला व बालकल्याण समितीची स्थापना महत्त्वपूर्ण मानली जात आहे.