विद्यार्थ्यांच्या पायाभूत शैक्षणिक विकासासाठी विविध नावीन्यपूर्ण उपक्रम- आयुष प्रसाद
जळगाव;- प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या मुलांचे वाचन व अंकगणित कौशल्य वृध्दींगत व्हावे, यासाठी कालबध्द कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या पायाभूत शैक्षणिक विकासासाठी विविध नावीन्यपूर्ण उपक्रम, संकल्पना राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज येथे दिली.
निपूण भारत अभियान अंतर्गत जिल्ह्यातील शाळांची शैक्षणिक क्षमतावृध्दी, विद्यार्थ्यांचा विकास, शिक्षणासाठी मुलभूत सोयी-सुविधा पुरविणे आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीतून जिल्ह्याचा समग्र विकास हा विषय घेवून जिल्हाधिकारी श्री.प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झालेल्या या बैठकीला जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट) चे प्राचार्य डॉ. अनिल झोपे, शिक्षणाधिकारी श्री. विकास पाटील व जिल्ह्यातील सर्व गट शिक्षणाधिकारी, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट) चे सर्व अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी श्री. प्रसाद म्हणाले की, जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शाळांत या महिन्यातील १० ते २० तारखेच्या कालावधीत पूर्ण वेळ विद्यार्थ्यांच्या अंकगणितीय मुलभूत कौशल्यात वृध्दीसाठी विविध संकल्पनांचा वापर करुन विशेष प्रयत्न करणेत येतील. २० ऑक्टोंबर पासून पुढील २ महिन्यांसाठी शालेय शिक्षणाच्या पहिल्या १ तासांत विविध माध्यमांचा उपयोग करुन विद्यार्थ्यांचे वाचनकौशल्य वृध्दींगत करण्यासाठी विशेष प्रयत्न करणेत येतील.
शाळांच्या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांमध्ये दृष्टीदोष असल्याचे निदर्शनास आले असल्याचे नमूद करून जिल्हाधिकारी श्री. प्रसाद म्हणाले की, विद्यार्थ्यांना व्यवस्थित न दिसल्यास त्यांच्या वाचनात, लिखाणात व आकलनात दोष निर्माण होतो. ते टाळण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी, रेडक्रॉस, स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून पुढील २ महिन्यांत नेत्ररोग तज्ज्ञ व तंत्रज्ञ यांच्या शाळाभेटी आयोजित करण्यात आल्या असून त्यांचेद्वारे विद्यार्थ्यांचे डोळे तपासणी करणे व आवश्यकतेनुसार त्यांना औषधी, चष्मे पुरविण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील विविध शाळांच्या भेटीप्रसंगी वर्गखोल्यांमध्ये पुरेसा उजेड नसल्याचे निदर्शनास आले होते. पुरेशी दृश्यमानता नसल्यास विद्यार्थ्यांची एकाग्रता होणे अवघड असते. सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये वीज जोडणी करणे, आवश्यकतेनुसार उजेड पुरविणारी प्रकाशव्यवस्था करणे, यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे गटशिक्षणाधिकारी यांना जिल्हाधिकाऱ्यांनी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी यावेळी निर्देश दिले.
विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेत वाढ करुन आनंददायी वातावरण त्यांना उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण उपलब्ध होईल, यासाठी जिल्हा प्रशासन कसोशीने प्रयत्न करणार आहे. विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणा व्यतिरिक्त इतर कुठल्याही मोहिमेत सहभागी न करण्याच्याही सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.