लोकलमध्ये साखळी बॉम्बस्फोट करण्याच्या धमकीचा पोलिसांना फोन
मुंबई – लोकलमध्ये साखळी बॉम्बस्फोट करणार असल्याची धमकी देणारा कॉल मुंबई पोलीस कंट्रोल रूमला आला आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी मुंबई पोलिसांना धमकीचा फोन आला आहे. जुहू पोलिसांनी गांभीर्याने तपास करत धमकीचा कॉल करणाऱ्या फोन करणाऱ्या व्यक्तीला तत्काळ ताब्यात घेतले आहे.त्याच्या संपूर्ण चौकशीनंतर सत्य समोर येणार आहे.
फोनवरील व्यक्तीने मुंबईच्या लोकलमध्ये बॉम्ब ठेवल्याचा दावा केला. महिला पोलिस अधिकाऱ्याने त्याच्याकडून अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्याने कोणतेही उत्तर दिले नाही. जुहूच्या विलेपार्ले परिसरातून बोलत असल्याचे सांगून अज्ञात व्यक्तीने फोन बंद केला. पोलिसांनी माहिती घेण्यासाठी पुन्हा फोन करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा समोरच्या व्यक्तीने त्याचा फोन बंद केला होता. मात्र, पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सुरक्षा यंत्रणांना सतर्क केले. अज्ञात व्यक्तीने धमकी कशामुळे दिली, याबाबत जुहू पोलिसांकडून सखोल तपास करण्यात येत आहे. आजवर मुंबई ही नेहमीच दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असल्याचे दिसून आले आहे. यापूर्वी मुंबईतील रेल्वेत साखळी बॉम्बस्फोट घडल्याची घटना होती.