रायसोनी महाविद्यालयात २० ते २३ जुलै दरम्यान जी. एच. रायसोनी मेमोरियल महाराष्ट्र राज्य निवड फिडे बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन
विविध जिल्ह्यातून खेळाडू होणार सहभागी ; तब्बल ७२ हजार रकमेची रोख पारितोषिके व चषक होणार विजेत्यांना वितरीत
जळगाव | प्रतिनिधी
जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविध्यालय नेहमी युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवीत असते या अनुषंगाने अखिल भारतीय बुद्धिबळ संघटना, महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटना व जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने जळगाव शहरात ता. २० ते २३ जुलै दरम्यान “जी. एच. रायसोनी मेमोरियल खुल्या महाराष्ट्र राज्य निवड गुणांकन बुद्धिबळ स्पर्धा” आयोजित करण्यात आल्या आहे. जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयाच्या प्रशस्त अश्या सेमिनार हॉलमध्ये या स्पर्धा रंगणार आहेत. अशी माहिती रायसोनी इस्टीट्युटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी, संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव नंदलाल गादिया, जैन स्पोर्ट अकॅडमीचे अरविंद देशपांडे, रवींद्र धर्माधिकारी व आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ पंच प्रवीण ठाकरे यांनी सोमवारी रायसोनी महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
जळगाव जिल्ह्यातील हि पहिलीच क्लासिकल प्रकारातील फिडे मानांकन स्पर्धा असून ता. २० ते २३ जुलै दरम्यान एकूण आठ फेऱ्यामध्ये स्विस साखळी पद्धतीने ती खेळवली जाणार आहे. सदर स्पर्धेला जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटचे मौलाचे असे प्रायोजकत्व लाभले असून स्पर्धेसाठी लागणारा हॉल, प्रत्येक जिल्हातून निवड झालेल्या एकूण ४ खेळाडूंची निवासाची मोफत व्यवस्था तसेच स्पर्धा विजेत्यांना तब्बल ७२ हजार रुपये रोख व आकर्षक चषक देऊन गौरवण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य निवड बुद्धिबळ स्पर्धेतून पहिल्या येणाऱ्या चार खेळाडूंची निवड ६० व्या राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात होणार असून ६० वी राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा पुणे येथे दि. १६ ते २७ ऑगस्ट २०२३ दरम्यान होणार आहे. या अनुषंगाने नवोदित व गुणी खेळाडूंना या स्पर्धा जिल्हा पातळीवर अनुभवयास मिळणे तसेच या स्पर्धेतून आंतरराष्ट्रीय फीडे मानांकन मिळविण्याची सुवर्णसंधी म्हणजे पर्वणी असून अशा स्पर्धांमधून ग्रँडमास्टर बनण्याच्या वाटचालीची संधी नवोदित खेळाडूंना नक्की मिळेल अशी खात्री रायसोनी इस्टीट्युटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली