कांचननगरमध्ये दोन गटात तुफान हाणामारी
परस्परांविरुध्द गुन्हा ; चॉपर, विटांचा वापर
जळगाव : प्रतिनिधी
मागील भांडणाच्या कारणावरून कांचन नगरातील चौघुले प्लॉट येथे गुरूवारी रात्री दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. या घटनेत चॉपर, लोखंडी पट्टी आणि विटांचा वापर करण्यात आल्यामुळे पाच जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी शुक्रवारी पहाटे शनिपेठ पोलिस ठाण्यात परस्परविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संतोष रमेश शिंदे (४५, रा. चौघुले प्लॉट, कांचननगर) यांच्या फिर्यादीनुसार गुरूवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास तीन जणांनी मागील भांडणाच्या कारणावरून शिंदे यांच्यासह त्यांचा मुलगा हितेश व आकाश मराठे यांना चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. नंतर तिघांनी त्यांच्यावर चॉपरने वार करून जखमी केले. शिंदे यांच्यासह त्यांचा मुलगा जखमी झाला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. शिंदे यांच्या तक्रारीनुसार तीन जणांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
चॉपर, विळ्याने केले वार
महेश गोविंदा चौधरी (२३, रा. हरिओमनगर) यांच्या फिर्यादीनुसार, मागील भांडणाच्या कारणावरून गुरुवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास हितेश शिंदे (२२), संतोष शिंदे (४५), आकाश मराठे (२३, रा. चौघुले प्लॉट, कांचननगर) यांच्यासह सात जणांनी चौधरी व त्यांच्या ओळखीचे विजय पाटील यांना चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. शिवाय त्यांच्यावर चॉपरने वार करून जखमी केले. काहींनी त्यांना विटा मारून दुखापत केली. या घटनेत चौधरी हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. याप्रकरणी चौधरी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.