DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

पाटणादेवीला अतिधोकादायक तितूर नदीवरील तात्पुरत्या पुलाच्या उभारणीच्या कामाला प्रारंभ

पाटणादेवीचा यंदाचा नवरात्र उत्सव अविस्मरणीय करण्याचा संकल्प : आमदार मंगेशदादा चव्हाण

चाळीसगाव : प्रतिनिधी
गेल्या ३ वर्षांपासून पुरातत्व विभागाच्या कायद्याच्या कचाट्यात अडकलेल्या आदिशक्ती चंडीकादेवी (पाटणादेवी ता.चाळीसगाव) मंदिराजवळील तितूर नदीवरील पुलाच्या कामाला या नवरात्र उत्सवात देखील मुहूर्त मिळाला नाही. आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी आपल्या आमदार निधीतून दोन वेळा २५ लाख रुपयांच्या निधीचे पत्र देऊनही नवीन पुलाच्या बांधकामासाठी केंद्र सरकारच्या अखत्यारीतील पुरातत्व विभागाने परवानगी दिली नाही. पाटणा ग्रामस्थांनी सदर पुलासाठी जलसमाधी आंदोलन देखील पुकारले होते. अतिशय धोकेदायक व पाण्याचा प्रचंड प्रवाह असणाऱ्या या नदीतून जीव मुठीत धरत यावर्षीदेखील लाखो भाविक भक्तांना मार्ग काढावा लागतो की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना आमदार मंगेशदादा चव्हाण यांनीच सदर कामासाठी पुढाकार घेतला आहे. भाविकांच्या सोयीसाठी तितूर नदीवर तात्पुरत्या स्वरुपात पुलाच्या उभारणीचे काम आज दि.१२ ऑक्टोंबर पासून सुरु करण्यात आले आहे. आमदार मंगेशदादा यांनी स्वतः कामाच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली व पुलाच्या उभारणी संदर्भात सूचना दिल्या. पाटणाईच्या सेवेसाठी अखेर पाटणादेवीचे निस्सीम भक्त असणारे आमदार मंगेशदादा चव्हाण यांनीच पुढाकार घेतल्याने शारदीय नवरात्र उत्सवाला दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांची मोठी सोय यानिमित्ताने होणार आहे. सदर पाहणी प्रसंगी वन्यजीव विभागाचे अधिकारी श्री.देसाई, श्री.जाधव, पाटणा सरपंच नितीन पाटील, माजी नगरसेवक भास्कर पाटील, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष भावेश कोठावदे, मनोज गोसावी, आदी उपस्थित होते.

पाटणादेवीचा यंदाचा नवरात्र उत्सव अविस्मरणीय करण्याचा संकल्प – आमदार मंगेशदादा चव्हाण
नऊ दिवस – नवदुर्गा संकल्पनेवर सजवला जाणार मंदिर व परिसर, देवीला दागिन्यांचा साज

खानदेशाची कुलदैवत आदिशक्ती चंडीकादेवी (पाटणादेवी) च्या शारदीय नवरात्र उत्सवासाठी देशभरातून लाखो भाविक येत असतात. या भाविकांच्या सोयीसुविधा व उत्सवाची तयारी पाटणा ग्रामपंचायत, ग्रामस्थ, मंदिर ट्रस्ट मार्फत केली जात होती, मात्र गेल्या काही वर्षांपासून सदर मंदिराचे संपूर्ण नियंत्रण पुरातत्व विभागाने घेतल्याने भाविकांच्या सोयीसुविधांची वानवा होत आहे. हि बाब लक्षात घेत आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी यावर्षीचा नवरात्र उत्सव अविस्मरणीय करण्याचा संकल्प केला आहे. पाटणादेवी मंदिर व परिसर नऊ दिवस – नवदुर्गा संकल्पनेवर आधारित सजवला जाणार आहे, तसेच देवीला दागिन्यांचा साज घालून मढवले जाणार असून भाविकांच्या वाटेत विद्युत रोषणाई देखील केली जाणार असल्याने एक वेगळीच अध्यात्मिक अनुभूती भाविकांना मिळणार आहे. लोकप्रतिनिधी म्हणूनच नव्हे तर देवीचा भक्त या नात्याने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना अडचणी येऊ नयेत याची जबाबदारी माझी आहे, त्यामुळे पुरात्तव विभागाच्या वेळकाढू नियमांच्या मागे न लागता मी स्वतः पुढाकार घेऊन तात्पुरता पूल उभारून देत आहे. हि सर्व सेवा आई पाटणादेवीच्या चरणी अर्पण करत असल्याची भावना आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी व्यक्त केली.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.