जिल्हा बँक अध्यक्षपदासाठी ११ मार्च रोजी निवड प्रक्रिया
जळगाव : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (jdcc bank) चेअरमन आणि व्हाइस चेअरमन पदाच्या निवडीसाठी ११ मार्च रोजी विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेच्या अध्यक्षस्थानी अध्यासी अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई हे राहणार आहेत.
गुलाबराव देवकर आणि शामकांत सोनवणे यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चेअरमन आणि व्हाइस चेअरमन पदाचा राजीनामा दिला होता. त्यांचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांनी राजीनामा दिला होता. संचालक मंडळाच्या मंजुरीनंतर राजीनामा प्राधिकरणाकडे पाठविण्यात आला. त्यानुसार जिल्हा बँकेच्या चेअरमन, व्हाइस चेअरमन पदाच्या निवडीसाठी अध्यासी अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांची नियुक्ती करण्यात आली. ११ मार्च रोजी चेअरमन आणि व्हाइस चेअरमन पदाच्या निवडीसाठी विशेष सभा होणार आहे.
चेअरमन पदासाठी ज्येष्ठ संचालक प्रदीप देशमुख, अॅड. रवींद्र पाटील, संजय पवार यांची नावे चर्चेत आहेत तर व्हाइस चेअरमन पदासाठी अमोल चिमणराव पाटील यांचे नाव चर्चेत आहे. आता जिल्हा बँकेच्या चेअरमनपदी कोणाची वर्णी लागते, याकडे लक्ष लागले आहे.