अमळनेरात अडीच लाखाचा गांजा जप्त, एकाला अटक
अमळनेर : प्रतिनिधी
अमळनेर शहरात बस स्थानकाजवळ विक्रीकरण्यासाठी आणलेल्या २,३०,००० हजार रुपये किमतीचा १५ किलो गांजा अमळनेर पोलिसांनी जप्त केला आहे. त्यात एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, गुरवार दि. 22 रोजी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास अमळनेर बस स्थानकाजवळ दोन जण गांजा आणणार असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांना मिळाली होती.त्यानुसार बसस्थानक परिसरात राधेश्याम रामसिंग पावरा व सुरेश साहेबराव भदाणे दोन्ही रा.हिसाळे ता.शिरपूर जि. धुळे हे एका पिशवीत सुमारे दोन लाख तीस हजार रुपये किमतीचा १५ किलो ५६६ ग्रॅम गांजा सोबत पोलिसांना आढळून आले. सुरेश साहेबराव भदाणे यास पोलिसांची चाहूल लागताच तो पळून जाण्यास यशस्वी झाला.तर राधेश्याम रामसिंग पावरा याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून सहायक फौजदार राजेंद्र कोठावदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक विजय शिंदे करीत आहेत. दि.23 रोजी आरोपीस अमळनेर न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.