गुलाबराव देवकर यांचा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
जळगाव : गेल्या चार ते पाच दिवसांपासून गुलाबराव देवकर हे जिल्हा बँकेचे अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याची जोरदार चर्चा रंगली होती. अखेर या चर्चेला पूर्णविराम मिळाला असून गुलाबराव देवकर यांनी आज जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्याचबरोबर श्यामकांत सोनवणे यांनी देखील उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
जळगाव जिल्हा बँकेवर सध्या महाविकास आघाडी- शिवसेना (शिंदे गट) यांची सत्ता आहे. निवडणुकीनंतर एका वर्षासाठी पद वाटपाचा निर्णय झाला होता. त्यानुसार गुलाबराव देवकर आणि श्यामकांत सोनवणे यांची अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदी निवड झाली होती. दोघांचाही वर्षभराचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने दोघांनी राजीनामे देण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत झाला होता. त्यानुसार 4 फेब्रुवारीला जिल्हा बँकेच्या संचालकांचे एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली होती. या बैठकीत एकनाथ खडसे यांनी गुलाबराव देवकर ही राजीनामा देणार असल्याची माहिती दिली होती.
शिवाय जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेनेला दोन वर्ष तर राष्ट्रवादीला तीन वर्ष असा अध्यक्षपदासाठीचा फार्म्युला ठरला होता. प्रत्येकी एक वर्षासाठी राष्ट्रवादीकडून नवीन व्यक्तीला अध्यक्षपद दिले जाईल असा असा निर्णय झाला होता. त्यानुसार एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने राजीनामा दिला असल्याची माहिती देवकर यांनी बोलताना दिली आहे. आपल्या एक वर्षाच्या कार्यकाळात आपण शेतकरी हिताचे निर्णय घेतले असून बँकेचा संचित तोटा कमी केला आहे, असंही देवकर यांनी म्हटलं आहे. सुरुवातीला माझा राजीनाम्यावर कार्यकर्त्यांमध्ये तीव्र भावना होती. मी अगोदर सोमवारी राजीनामा देणार होतो. मात्र, कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन, सोमवारी मी प्रचारावेळी सहकार्य केलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला असं गुलाबराव देवकर म्हणाले.
जिल्हा बँकेचा अध्यक्ष कोण होणार?
गुलाबराव देवकर यांनी राजीनामा दिल्यानंतर आता जिल्हा बँकेचा अध्यक्ष कोण होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. जिल्हा बँकेच्या पुढील अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील, माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, संजय पवार, अॅड. रोहिणी खडसे यांचे नावे चर्चेत आहेत. आता अध्यक्षपदावर कुणाची वर्णी लागते, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. ठरल्या फॉर्म्युल्याप्रमाणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर यांनी राजीनामा दिल्याने आगामी जिल्हाध्यक्ष कोण होणार? याची चर्चा राजकीय क्षेत्रात रंगू लागली आहे.