DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

हिंमत असेल तर खडसेंनी आमदारकीचा राजीनामा द्यावाः संजय पवार

जळगाव | प्रतिनिधी
माजीमंत्री, आ. एकनाथराव खडसेंनी आजवर खुनशी राजकारण करत अनेक नेत्यांना संपविले. खडसे अंधारात असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खडसेंना उजेडात आणले. आमदारकी दिली. पक्षांतर्गत विरोध असताना देखील त्यांना उमेदवारी दिली. राष्ट्रवादी पक्ष वाढला नाही मात्र गटबाजी वाढली. आज खडसे विधानपरिषद सदस्य आहेत. ज्यांनी मतदान केले त्यापैकी २५ सदस्य आज अजित पवारांसोबत आहे.
आज खडसे अजित पवार, मंत्री अनिल पाटलांवर आरोप करताहेत. खडसेंनी स्वाभिमान असेल तर त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा. नंतर अजित पवारांवर बोलावे असे आव्हान राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष (अजित पवार गट) संजय पवार यांनी दिली आहे. माजी मंत्री खडसे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, बारामती इच्छूक उमेदवार सुनेत्रा अजित पवार, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्याविषयी काही अनूदगार काढले होते. त्याविरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पत्रकार परिषद घेण्यात आली. राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, अरविंद मानकरी, सीमा नेहते, रमेश पाटील, योगेश देसले, सोनाली पाटील आदी उपस्थित होते.

एकनाथ खडसे ‘रणछोडदास’ : अध्यक्ष पवार म्हणाले की, खडसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आल्यावर स्वतःला आमदारकी मिळवली, मुलीला प्रदेशाध्यक्ष केले. तेव्हापासून त्यांनी एक डावपेच आखण्यास सुरुवात केली. रावेर लोकसभेची जागा मीच लढणार म्हणून त्यांनी सर्वांना सांगत आपल्या पदरात पाडून घेतली आणि सुनेच्या भाजप तिकीटाची आखणी केली. आज खडसे मी रावेर लोकसभा लढणार नाही असे सांगत ते पळून गेले. ते रणछोडदास’ आहेत असा आरोप संजय पवार यांनी केला.

 

आधी राजीनामा दया मग बोला : ज्या पक्षाने त्यांना ३५ वर्ष मान सन्मान दिला त्यांना ते झाले नाही. पवार साहेबांना अंधारात ठेवून त्यांनी स्वतःच्या सुनेची उमेदवारी घेतली. स्वतःसाठी किंवा मुलीसाठी उमेदवारी त्यांनी घेतली नाही. दरवेळी ते लेवा समाजावर अन्याय होतो म्हणून ते सांगतात मात्र गेल्या वेळी हरिभाऊ जावळे यांची उमेदवारी कापताना त्यांना ते दिसले नाही. अगोदर खडसेंनी राजीनामा द्यावा आणि मग अजित पवारांवर बोलावे, असा टोला त्यांनी लगावला.

खडसेंनी कुटूंबासह स्वतःला ‘सेट’ केले : भाजपने खडसेंना अनेक वेळा मंत्री केले, विविध पदे दिली तरी त्यांनी पक्ष सोडला. कुटुंब आणि स्वतःला ‘सेट’ करण्याचे काम खडसेंनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येताना मी पक्ष बांधणी करेल असे ते म्हणाले होते मात्र त्यांनी पक्षाचा वापर करून घेतला. कुणाचा, कधी आणि कुठे वापर करायचा हे खडसेंनी साध्य केले आहे, असा आरोप जिल्हाध्यक्ष पवार यांनी केला आहे.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.