जळगावच्या भाजप कार्यालयात प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे लाईव्ह प्रक्षेपण
जळगाव | शहरातील भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यालयात सोमवारी (ता. 22) अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे लाईव्ह प्रक्षेपण मोठ्या स्कीनवर दाखविण्याची सोय करण्यात आली होती. यावेळी प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित सर्व मान्यवर व कार्यकर्त्यांनी केले. प्रभू श्रीरामाच्या जयघोषाने भाजप कार्यालयाचा परिसर दुमदुमुन गेला होता.
अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा कार्यक्रमाचे औचित्य साधून बळीराम पेठेतील वसंत स्मृती हे भाजपचे जिल्हा कार्यालय आकर्षक रंगरंगोटी तसेच विद्युत रोषणाईने सजविण्यात आले होते. अयोध्येतील मनोहारी सोहळा पक्ष कार्यकर्त्यांसह रामभक्तांना पाहणे सोयीचे व्हावे म्हणून भाजप कार्यालयाच्या प्रशस्त प्रांगणात मोठ्या स्क्रीनची सोय केलेली होती. त्यामाध्यमातून संपूर्ण सोहळा अगदी जवळून डोळा भरून पाहण्याचे भाग्य सर्वांना लाभले. भाजपचे जळगाव शहराचे आमदार राजूमामा उर्फ सुरेश भोळे, भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील जळकेकर महाराज, भाजपच्या जळगाव महानगराध्यक्षा उज्ज्वला बेंडाळे आदींसह भाजपा व भाजपा युवा मोर्चा, भाजपा महिला आघाडीचे प्रदेश, जिल्हा व मंडळ पदाधिकारी, याशिवाय शक्ती केंद्र तसेच बूथ प्रमुख, सुपर वारियर्स यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांना कार्यक्रमाच्या शेवटी मिठाईचे वाटप देखील करण्यात आले.