राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जाहीरनामा प्रसिद्ध; महत्वाचे मुद्दे जाणून घ्या…
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (अजित पवार गट) जाहीरनामा आज प्रसिद्ध झाला आहे. पक्ष कार्यालयात अजित पवार यांनी जाहीरनामा प्रसिद्ध केला. यावेळी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, बाबा सिद्दीकी यांच्यासह अनेक बडे नेते मंचावर उपस्थित होते.
या जाहीरनाम्यात, कृषी, वीज, उद्योग आदी विविध क्षेत्रासाठी त्यांनी घोषणा केल्या आहेत. तसेच, जातनिहाय जनगणनेचाही प्रश्न मार्गी लावण्यात येणार असल्याचे अजित पवारांनी म्हटले आहे. ‘राष्ट्रासोबत राष्ट्रवादी’ हे ब्रीदवाक्य घेऊन राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या लोकसभा निवडणुकीत जनतेसमोर येत आहे, असे राष्ट्रवादी पक्षाने स्पष्ट केले.
राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यातील महत्वाचे मुद्दे –
- – जाती आधारित जनगणनेच्या मागणीला समर्थन देण्याचे आश्वासन.
- – महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री आणि संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण यांना देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न देण्याची मागणी करणार.
- – पक्षाची सत्ता आल्यावर जातीनिहाय जनगणनेची मागणी करणार.
- – राज्यातील उर्दू माध्यमाच्या शाळांना सेमी-इंग्रजीचा दर्जा देणार.
- – शेतमालाला किमान आधारभूत किंमत देणार.
- – अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी पाठपुरावा करणार.
- – अपारंपरिक वीज निर्मितीला चालना.
- – उद्योगांना प्राधान्य.
- – कृषी पिकविम्याच्या व्याप्तीत वाढ.
- – शेतकरी सन्मान निधीत भरीव वाढ.
- – मुद्रा कर्ज योजनेत मर्यादित वाढ.
- – वन क्षेत्रात पाण्याचे साठे निर्माण व्हावेत यासाठी योजना.
- – संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व मिळावे यासाठी पाठिंबा.
“राष्ट्रवादी काँग्रेसची विकसित भारतासाठीची भूमिका स्पष्ट करणारा हा जाहिरनामा आहे. यात सार्वजनिक सेवा, पायाभूत सुविधासह आर्थिक प्रगतीचा संकल्प व्यक्त करण्यात आला आहे. आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, पर्यावरण आणि रोजगार ही ग्रामविकासाची पंचसूत्री सांगतानाच त्यानुसार आम्ही काम करणार आहोत, असे अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.
‘नयी आशा, नवी दिशा’च्या प्रवासाला सुरुवात – पटेल
आज एक महत्त्वाचा क्षण आहे जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसने ‘राष्ट्रवादींसाठी राष्ट्र’ या भव्य संकल्पनेतून लोकांची सेवा करण्याची आणि सर्वसमावेशक धोरणे समाजाच्या कानाकोपऱ्यात घेऊन जाण्याची अटळ वचनबद्धता जाहीर केली असल्याचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले आहे. एनडीएचे अभिमानास्पद भागीदार, आम्ही सर्वांच्या उज्ज्वल भविष्याची खात्री करू ‘नयी आशा, नवी दिशा’च्या प्रवासाला सुरुवात करण्यास तयार आहोत आणि एक मजबूत, अधिक समृद्ध भारताकडे वाटचाल करणार असल्याचा विश्वासही पटेल यांनी व्यक्त केला आहे.