DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

गणित हा समजण्याचा व सोडविण्याचा विषय – चंद्रहास हलाई

गांधी रिसर्च फाऊंडेशनची कार्यशाळा उत्साहात

जळगाव | प्रतिनिधी 

गणित हा समजण्याचा व सोडविण्याचा विषय आहे. गणित आपल्याला समस्येच्या मुळाशी घेऊन जातो. गणितातही सराव, साधना व सातत्य महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन मुंबई येथील चंद्रहास हलाई यांनी केले. येथील गांधी रिसर्च फाऊंडेशन व भारतीय सामाजिक विज्ञान अनुसंधान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने गांधी जयंती व भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने आयोजित “हाऊ गांधी कम्स अलाईव्ह” अंतर्गत ‘भारतीय गणिताची अद्भुत दुनिया’ विषयावरील कार्यशाळेप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाचे संचालक राकेश रामगुंदम, प्रा. गीता धर्मपाल व डॉ अश्विन झाला, सौ. अंबिका जैन आदी उपस्थित होते.

 

 

कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना हलाई म्हणाले कि, आधुनिक गणितातील संकल्पना भारतीय ऋषी मुनींनी आपल्या ग्रंथातून हजारो वर्षांपूर्वी मांडलेल्या आहेत. पिंगलाचार्य, आर्यभट्ट, भास्कराचार्य, ब्रह्मगुप्त, लीलावती आदींच्या ग्रंथांमधील छंद काव्याचा अभ्यास केल्यास त्याची प्रचिती येते. महावीराचार्य यांचा गणितसारसंग्रह ,भास्करांचे सिद्धांत शिरोमणी, कात्यायना सुलभासूत्र, याज्ञवल्क्य यांचा शतपथब्राह्मणम् हि भारतीय गणिताची समृद्धी असल्याचे ते म्हणाले. गणितातील अनेक गमतीजमती सांगत त्यांनी विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर केली. कार्यक्रमाच्या सुरवातीस मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविकात प्रा. गीता धर्मपाल यांनी महात्मा गांधी , गणित व शिक्षण पद्धती यातील संबंध मांडला.

कार्यशाळेतील दोन्ही सत्रात अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात व गणिताच्या सोप्या युक्ती हलाई यांनी विद्याथ्यांना समजावून सांगितल्या. मैथिली थत्ते, भाविक कपूर, सुकीर्ती मणियार, नेहा दसोरे व ऐश्वर्य चोपडा यांनी मनोगत व्यक्त केले. गणित विषयाची भीती गेली, गणिताबद्दल गोडी निर्माण झाली, गणित व इतिहास विषयाचा संबंध कळाला, दैनंदिन जीवनातील समस्या सोडविण्यासाठी देखील गणिताचा वापर कसा करता येईल याचे शिक्षण आजच्या कार्यशाळेत प्रात्यक्षिकाद्वारे मिळाले असे त्यांनी म्हटले. कार्यशाळेस रुस्तमजी इंटरनॅशनल, विवेकानंद प्रतिष्ठान, एल. एच. पाटील विद्यालय, लोकसेवक मधुकरराव चौधरी कॉलेज ऑफ सोशल वर्क व कॉलेज ऑफ फार्मसी, मु. जे. महाविद्यालय आदींचे शिक्षक, विद्यार्थी व पालकांनी कस्तुरबा सभागृह गच्च भरले होते. सूत्र संचालन गिरीश कुलकर्णी यांनी तर आभार दीपक मिश्रा, रमीज यांनी केले. यशस्वीतेसाठी उदय महाजन यांच्यासह नितीन चोपडा, डॉ. निर्मला झाला, निलेश पाटील, अदिती त्रिवेदी, रीती साहा, निवृत्ती वाघ, राजू माळी, सुनील तायडे व गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या सहकाऱ्यांनी सहकार्य केले.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.