DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

शिंदे मराठा, मुख्यमंत्री करण्यासाठी मी गद्दारी केली: गुलाबराव पाटील

जळगाव: ‘एक मराठा चेहरा शिवसेनेमधून बाहेर जात होता. त्याला मुख्यमंत्री करण्यामध्ये मी गद्दारी केली.’ असं वक्तव्य राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आणि शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. अवघ्या 50 आमदारांसोबत घेऊन केलेल्या बंडानंतर भाजपने थेट एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री  पद देऊ केलं. त्यामुळे बंडखोरी केलेल्या आमदारांचं  राज्याच्या राजकारणात वजन वाढलं आहे. त्यातच आता गुलाबराव पाटलांनी मराठा मुख्यमंत्री असं म्हणत एका नव्या विषयाला हात घातला आहे.

 

पाहा गुलाबराव पाटील नेमकं काय म्हणाले ?

‘फक्त विरोध करायचा.. अरे तुम्ही काय बोंब पाडली ते सांगा.. साध्या खेडेगावात तुम्ही मुतारी देऊ शकले नाही आणि वरून टीका करत असाल तर त्यांचं उत्तर.. जसं आमचे एकनाथ शिंदे साहेब सांगतात…’

गुलाबराव पाटील गद्दार झाले.. गद्दार झाले.. अरे गद्दार नाही झाले. एक मराठा चेहरा शिवसेनेमधून बाहेर जात होता. त्याला मुख्यमंत्री करण्यामध्ये मी गद्दारी केली. काय म्हणणं आहे तुझं? माझं चॅलेंज आहे या लोकांना.. हे जे टीका करतात.. शरद पवार, शरद पवार.. एकनाथ शिंदे कोण आहे रे? कोण आहे तो शिंदे?… (मराठा).. मग मी काय मेन्टल आहे का?’

‘म्हणजे सांगायचा अर्थ असा आहे की, तुम्ही प्रत्येक गोष्टीला तुम्ही जातीवाद करत असाल तर गुलाबराव पाटलाने जो त्याग केला तो एकनाथ शिंदेंकरिता केला आहे. चॅलेंजने सांगतो.. तुमचा गुलाबराव पाटील एकनाथ शिंदेचा बाजूला बसतो.. यावरच तुमच्या मतदारसंघाचा जयजयकार आहे.’

 

‘हे लोकं टीका करतात. यांना टीकेशिवाय काही नाही. धरणगाव.. धरणगाव.. काय.. आता काय राहिलंय बाकी तिकडे.. थोडं राहिलंय.. थोडं.. ते पण होऊन जाईल. ठीकए मी मंत्री झाल्यापासून थोडा संपर्क कमी झाल आहे.’ असं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं आहे.

शिवसेनेच्या पन्नास आमदारांनी अगदी योग्य निर्णय घेतला आहे’

दुसरीकडे गुलाबराव पाटलांच्या या वक्तव्याबाबत जेव्हा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारण्यात आलं तेव्हा ते म्हणाले की, ‘गुलाबराव पाटील काय म्हणाले हे मी पाहिलेलं नाही.. हाडामासाचा कट्टर शिवसैनिक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला आणि छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन बाळासाहेब यांच्या विचारावर काम करणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला.. सोबत देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा नेता आहेच.. त्यामुळे शिवसेनेच्या पन्नास आमदारांनी अगदी योग्य निर्णय घेतला आहे.’

‘उद्धव ठाकरे यांची सत्ता कायम राहिली असती.. तर शिवसेनेचे अनेक आमदार पराभूत झाले असते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जिंकले असते आणि याच कारणामुळे सत्ता परिवर्तन झालं आहे.’ असं बावनकुळे यावेळी म्हणाले.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.