DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

महाविकासच्या शक्तीप्रदर्शनात रिकाम्या ट्रॅक्टरची ‘हवा’!

सभेकडे फिरविली अनेकांनी पाठ : ढिसाळ नियोजनाचा नेत्यांनाच फटका

जळगाव :  लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करतांना महाविकास आघाडीने शहरात आज शक्तीप्रदर्शन केले असले तरी त्यात रिकाम्या ट्रॅक्टरचीच ‘हवा’ दिसून आली. ग्रामीण भागातून कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर आले असतांनाही त्यांनी मात्र सभेकडे पाठ फिरविली.
बुधवारी महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील व करण पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी वरिष्ठ नेते उपस्थित होते. शिवतीर्थ मैदानापासून शक्तीप्रदर्शन करीत रॅली काढण्यात आली यावेळी बहुतांश कार्यकर्ते हे जळगावात फेरफटका मारतांना दिसून आले. रॅलीत महिलांची उपस्थिती अतिशय नगण्य होती. बरेच ट्रॅक्टर हे रिकामेच धावत होते. प्रचंड उखाडा असतांनाही कार्यकर्त्यांना पिण्याच्या पाण्याची सुविधा अतिशय तोडकी होती. रॅलीमध्ये कुठल्याही प्रकारचे नियोजन दिसून आले नाही. घोषणांचा देखील दुष्काळ दिसून आला. कार्यकर्त्यांना वारंवार सूचना देवून त्याकडे कुणीही लक्ष देत नव्हते. उघड्या जीपमध्ये गर्दी झाल्याने उबाठा गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना पायपीट करत व्यासपीठ गाठावे लागले.

नेत्यांनाही बसला फटका
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उभारण्यात आलेल्या व्यासपीठावर स्थानिक कार्यकर्त्यांनी गर्दी केल्याने नेत्यांना त्याचा फटका सहन करावा लागला. वारंवार आवाहन करूनही कुणीही त्याकडे लक्ष देत नव्हते. जितेंद्र आव्हाड यांचे भाषण सुरु होतात, महिलांनी काढता पाय घेतला. एकंदरीत या शक्तीप्रदर्शनात ढिसाळ नियोजन दिसून आल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.