जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात अंगावर पेट्रोल टाकून तरूणाचा आत्मदहनाचा प्रयत्न !
जळगाव | प्रतिनिधी
भडगाव तालुक्यातील कजगाव या गावातील अतिक्रमणाबाबत वेळोवेळी तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने, कंटाळलेल्या एका तरुणाने आज सोमवार 23 जानेवारी रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.
भडगाव तालुक्यातील कजगाव या गावात शासकीय जमिनीवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करण्यात आले आहे, मात्र काही राजकीय व्यक्तींमुळे या अतिक्रमणावर कारवाई केली जात नसल्याचा भूषण नामदेव पाटील या तरुणाचा आरोप आहे. अतिक्रमण काढून या ठिकाणी अध्यायावत बस स्थानक होईल एवढीच जागा आहे. मात्र वेळोवेळी तक्रारी करूनही कुठलीही कारवाई होत नसल्याने भूषण नामदेव पाटील हे आज जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात त्यांनी स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. प्रकार लक्षात आल्यावर पोलिसांनी भूषण पाटील यांच्या हातातून पेट्रोल ची कॅन तसेच भूषण ला ताब्यात घेतले. त्यामुळे अनर्थ टळला. भुषण यास पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांची कारवाई सुरू असून या घटनेने जिल्हाधिकारी आवारात मोठी खळबळ उडाली आहे.