DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

महाराष्ट्रातली १४ गावं का करतात दोनदा मतदान ?

राज्यात चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडलं आहे. या निवडणुकीदरम्यान अनेक ठिकाणी गैरप्रकार समोर आले आहेत.काही ठिकाणी मतदार याद्यांमधील घोळ, EVM मशीनमध्ये बिघाड, बोगस मतदान असे प्रकार घडल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.. हे सगळे गैरप्रकार एकीकडे असताना दुसरीकडे मात्र महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यामध्ये असणारी १४ गावं एका रंजक आणि तितक्याच महत्त्वाच्या कारणासाठी चर्चेचा विषय ठरलीयत. कारण, ही गावं फक्त महाराष्ट्रच नव्हे तर आणखी एका राज्याच्या निवडणुकीसाठीसुद्धा मतदानाचा हक्क बजावतात. नेमकं असं काय कारण आहे ज्यामुळे महाराष्ट्रातल्या १४ गावांना दुसऱ्या राज्यातही मतदान करावं लागतं.या व्हिडिओतून जाणून घेऊयात.
१३ मे ला लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडलं. यात महाराष्ट्र आणि तेलगंणाच्या सीमेवर असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील १४ गावांनी दुसऱ्यांदा मतदान केलं आहे.विशेष म्हणजे, १४ गावातील नागरिकांनी पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल रोजी चंद्रपूर लोकसभेसाठी मतदान केलं होतं… आणि आता त्यानंतर चौथ्या टप्प्यात तेलगंणातील आदिलाबाद लोकसभेसाठी दुसऱ्यांदा मतदान केलं आहे.आता असं का तर चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती या दुर्गम तालुक्यातील १४ गावे तेलंगणा सीमेला लागून आहेत. या गावांवर तेलंगणा आणि महाराष्ट्र सरकार आप-आपला अधिकार सांगतात. पण ही गावं मूळ महाराष्ट्रात आहेत. दूरवर असलेली ही गावे नेहमीच विकासापासून, शासकीय योजनांपासून दूर राहिली आहेत. याचा फायदा घेत तेलंगणा सरकारनं या लोकांना रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, अंगणवाडी, शाळा, वीज अशा सुविधा देत आपल्याप्रती सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न चालवला आहे. दोन्ही राज्यांमधील सरकारांच्या योजनांचा लाभ इथले स्थानिक घेतात. स्वस्त धान्य असेल, घरकुल योजना असेल किंवा इतर योजना असतील, याचा लाभ ते घेत आहेत.

मतदानसुद्धा ते दोन्ही राज्यात करतात. तेलंगणातील प्रत्येक निवडणुकीत या गावांतील नागरिक सहभाग घेतात..या प्रत्येकाकडे दोन मतदार ओळखपत्र, रेशन कार्ड, आधार कार्ड आहे. आता यावेळच्या निवडणुकीत देखील आदिलाबाद लोकसभा मतदारसंघात गावकऱ्यांनी मतदान केलं…मुकादमगुडा, परमडोली, परमडोली तांडा, कोठा, लेंडीजाला, महाराजगुडा, शंकरलोधी, पद्मावती, अंतापूर, इंदिरानगर, येसापुर, पलसगुडा, भोलापठार,लेंडीगुडा या गावातील मतदारांनी दोन राज्यांसाठी डबल मतदान केलं आहे. महाराष्ट्र आणि तेलंगणा या दोन्ही राज्यांनी त्यांना मतदार म्हणून घोषित केलं असल्याने मागील कित्येक वर्षांपासून ते या दोन्ही राज्यात आपला मतदानाचा हक्क बजावत आले आहेत. यंदा दोन्ही राज्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मिळून हे दुहेरी मतदान टाळण्यासाठी विशेष उपाय काढत महत्वपूर्ण निर्णय घेतला की मतदारांच्या तर्जनीच्या संपूर्ण नखाला शाई लावली जाईल.
या शाहीच्या आधारे मतदारांची ओळख पटणार होती आणि त्यावरुन हे दुहेरी मतदान टाळलं जाऊ शकतं, असा तर्क दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांकडून लावण्यात आला होता. ठरल्याप्रमाणे दोन्ही राज्याच्या प्रशासकीय यंत्रणेने या नियमांची पूर्तता अमलबजावणी करणे अपेक्षित होतं. पण तसं होऊ शकलं नाही..आणि नागरिकांनी तेलंगणाच्या आदिलाबाद लोकसभेसाठी मतदान केलं.महाराष्ट्र सरकारच्या तुलनेत तेलंगणा सरकारने या गावात अधिक विकासात्मक कामे केली आहेत. त्यामुळे या गावातील नागरिकांचा कल तेलंगणा राज्याकडे अधिक आहे. या गावांची प्रमुख मागणी वन जमिनीचे पट्टे मिळण्याबाबत आहे…मात्र जमिनीचे पट्टे देण्यास महाराष्ट्र सरकार अपयशी ठरले आहे. तर दुसरीकडे तेलंगणा सरकारने जमिनीचे पट्टे वाटप केले आहेत. आणि त्यामुळे या गावांचे नागरिक तेलंगणासाठीही मतदान करतात.पण या सर्व अनागोंदी कारभाराला महाराष्ट्र सरकारच दोषी असल्याचा आरोप या भागातले महाराष्ट्रवादी कार्यकर्ते करतात…पण आरोप प्रत्यारोप बाजूला ठेवून दुहेरी मतदान न होता इथं एकदाच मतदान व्हावं यासाठी ठोस उपाययोजना करणं आवश्यक आहे.

 

 

 

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.