जळगाव मतदारसंघातही भाजपकडून उमेदवार बदलाच्या हालचाली
माजी खासदाराने घेतली गिरीश महाजनांची भेट
जळगाव – जळगाव लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटातर्फे करण पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. तसेच माजी खासदार उन्मेष पाटील यांनी भाजप सोडून शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केल्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात जोरदार खळबळ उडाली आहे. भाजपत इच्छुकांनी पुन्हा हालचाली सुरू केल्या आहेत. त्यात माजी खासदार ए. टी. पाटील यांनी भाजपचे नेते गिरीश महाजन यांची भेट घेतली. या दोघांमध्ये भाजप कार्यालयातच बंद दाराआड चर्चा झाल्याने भाजप उमेदवार बदलणार असल्याच्या चर्चांना उधाण आले.
उन्मेष पाटील यांचा भाजपला राम राम
जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपने विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांची उमेदवारी कापून माजी आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली आहे. त्यानंतर नाराज झालेले उन्मेष पाटील यांनी भाजपला राम राम करून शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. त्यांच्या समवेत असलेल्या पारोळा येथील माजी नगराध्यक्ष करण पवार यांनादेखील ठाकरे गटात प्रवेश केला.
उमेदवारीसाठी ए. टी. पाटील यांचा पुन्हा प्रयत्न
भाजपकडून उमेदवारीसाठी माजी खासदार ए.टी. पाटील हे इच्छुक होते. उमेदवारीसाठी दिल्लीत गेल्या आठवड्यात तळ ठोकून प्रयत्न केले होते. आता उन्मेष पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्याने भाजप उमेदवार बदलण्याच्या चर्चा सुरू झाल्याने उमेदवारीसाठी ए. टी. पाटील आता पुन्हा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. त्यांनी आज जळगाव येथे गिरीश महाजन यांची पक्ष कार्यालयात भेट घेतली.
करण पवार यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर झाल्याने भाजपमध्ये उडालेली खळबळ लक्षात घेत घेऊन ए. टी. पाटील यांनी गिरीश महाजन यांची भेट घेतल्याचे सांगण्यात येत आहे. ते पक्षातर्फे अद्यापही इच्छुक आहेत. 2019 मध्ये पक्षाने त्यांची उमेदवारी कापून स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली होती. त्यानंतर स्मिता वाघ यांचीही उमेदवारी रद्द करून उन्मेष पाटील यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी उन्मेष पाटील खासदार झाले होते. आता उन्मेष पाटील यांची उमेदवारी कापून स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली आहे, तर नाराज उन्मेश पाटील भाजपतून बाहेर पडले आहे.
भाजप उमेदवारी बदलण्याबाबतच्या केवळ चर्चा सुरू आहेत. पक्षाच्या नेत्यांनी जळगाव व रावेर दोन्ही ठिकाणची उमेदवारी बदलणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, माजी खासदार के. टी. पाटील व गिरीश महाजन यांच्या या भेटीमुळे या चर्चेने पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे आता उमेदवारी अर्ज दाखल होईपर्यंत भाजपच्या भूमिकेकडे लक्ष असणार आहे. दरम्यान, ए. टी. पाटील यांनी आपली केवळ निवडणूक प्रचाराबाबत महाजन यांच्याशी चर्चा झाली आहे, असे सांगत उमेदवारीबाबत काहीही बोलले नाही.