DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

भीषण अपघातात तरुणाचं शीर धडापासून वेगळं ; जळगावातील धक्कादायक घटना

जळगाव : जळगाव शहरातील खोटे नगराजवळील वाटीकाश्रम समोरील राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. प्रशांत भागवत तायडे (वय ३०, रा. गहूखेडा ता.रावेर जि. जळगाव) असे मयत तरूणाचे नाव आहे. जयेश द्वारकानाथ पाटील (वय २३, रा. गहूखेडा ता. रावेर) हा या अपघातात गंभीर जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत तायडे आणि जयेश पाटील हे दोघे मित्र रावेर तालुक्यातील गहुखेडा येथील रहिवाशी आहेत. दोघेजण धरणगाव तालुक्यातील चिंचपूरा येथील आबासाहेब शिवाजीराव सिताराम पाटील इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्नीक येथे मेकॅनिकल इंजीनियरिंग डिप्लोमाच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहेत. गेल्या तीन दिवसांपासून त्यांचे डिप्लोमाचे पेपर सुरू आहेत. शुक्रवारी तिसरा पेपर असल्याने दोघे मित्र सकाळी गहुखेडा येथून दुचाकी क्रमांक (एमएच १९ सीपी २३५५) ने जळगाव मार्गे चिंचपूरा येथे जाण्यासाठी निघाले.

 

या दरम्यान वाटेतच दुपारी १ वाजेच्या सुमारास जळगावातील खोटे नगर जवळील वाटिकाश्रम समोरील राष्ट्रीय महामार्गवर भरधाव आयशर क्रमांक (एमएच १९ सीवाय ८१६७)ने दुचाकीला मागून धडक दिली. धडकेनंतर दुचाकीवरील दोघेजण रस्त्यावर पडले. तर दुचाकीस्वार प्रशांत थेट समोरून येणाऱ्या खडीने भरलेले ट्रॅक्टर क्रमांक (एमएच १९ एएन २४३८) खाली आला. यात प्रशांतच्या डोक्यावरून ट्रॅक्टरचे पुढचे चाक गेल्याने या भीषण अपघातात थेट प्रशांतचे हेल्मेटसह डोकं शरीरापासून वेगळं होऊन रस्त्यावर पडलं. तर मागे बसलेला त्याचा मित्र जयेश पाटील हा गंभीर जखमी झाला.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील, पोलीस हेडकॉन्स्टेबल अनिल फेगडे, अनिल मोरे, प्रवीण पाटील या पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह तसेच जखमी झालेला जयेश पाटील याला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले.

एकुलता एक मुलगा गेल्याने तायडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर
अपघाताची माहिती मिळाल्यानंतर शासकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. मयत प्रशांत तायडे यांच्या पश्चात आई, वडील आणि विवाहित बहीण असा परिवार आहे. प्रशांत हा एकुलता एक मुलगा होता. तो भुसावळ तालुक्यातील दीपनगर येथे महावितरण कंपनीत नोकरीला होता. नोकरी कायमस्वरूपी तत्त्वावर व्हावी म्हणून प्रशांत डिप्लोमाचे शिक्षण पूर्ण करत असल्याची माहिती मिळाली आहे. एकुलता एक मुलगा गेल्याने तायडे कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रशांतचे आई, वडील तसेच बहिणीचा जिल्हा रुग्णालयातील आक्रोश बघून अनेकांचे डोळे पाणावले होते. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.