नियतीने दिली संधी अन् क्षणार्धात मृत्यूने गाठले
जळगाव – राष्ट्रीय महामार्गावरील खेडी गावाजवळील पेट्रोल पंपावर लोखंडी कंटेनर कडेला दाबून उभे करताना कंटेनरच्या क्लीनर साईडचा डीपीजवळील तारांना स्पर्श झाला. ही बाब लक्षात येताच वाहन बाजूला उभे करण्याच्या प्रयत्नात असतानाच चालकाचा वीजेचा जबर झटका लागून त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (ता. १६) घडली. जगदीशसिंग बोरा (वय ३९, रा. उत्तराखंड) असे मयत कंटेनर चालकाचे नाव असून एमआयडीसी पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.
जळगाव-भुसावळ दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर खेडी गावालगत पेट्रोल पंप आहे. शनिवारी सकाळी या पेट्रोल पंपावर जगदीशसिंग बोरा हा त्याच्या ताब्यातील (आरजे ०९ जीसी २५९७) हा कंटेनर घेवुन पोचला. रात्रभराचा प्रवास असल्याने त्याने पंपावरच गाडी लावून आराम करणार असल्याचे सांगितल्याने तो पंपावरील वॉचमनच्या सांगण्याप्रमाणे त्याचे कंटेनर पंपाच्या कुंपणाला पार्क करत होता. त्याच्या कंटेनरच्या मागे पांढरी प्रवासी लक्झरी बस उभी होती. मागे पंपावरील वॉचमन त्याला मागील बाजू सांगत होता. थोड पुढे घेवुन कंटेनर आखणी कुंपणाला दाटून उभे करण्याच्या प्रयत्नात चालक जगदीशसिंग बोरा याचे लक्ष क्लीनर बाजूकडील विद्युत डीपीकडे गेलेच नाही.
परिणामी लोखंडी आवरणाच्या या कंटेनरची क्लिनरसाईडची केबिनचा कोपरा अगदीच विद्युत खांबाजवळ भिडला. काहीतरी वेगळं झाल्याच्या शंकेतून त्याने खाली उतरून बघितले आणि कंटेनर पुढे घेऊन थोडं अंतर ठेवण्याच्या विचाराने गाडीच्या स्टिअरिंगवर चढत असतानाच त्याला अतिउच्चदाबाचा विद्युत झटका लागून तो जागीच कोसळून मृत्युमुखी पडला. घडल्या प्रकाराने सकाळीच खेडी पेट्रोलपंपावर एकच खळबळ उडाली. एमआयडीसी पोलिसांना पाचारण करण्यात आले. सावधगिरी बाळगून चालक जगदीशसिंग याला बाजूला करुन जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्यास मृत घोषित केले. एमआयडीसी पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी त्याच्या ताब्यातील कागदपत्रांवरून त्यांच्या गाडीमालकासह कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली आहे. मात्र, उत्तराखंड लांब असल्याने त्याच्या कुटुंबीयांना पेाहचायला २-३ दिवस लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नियतीने दिली संधी.. पण
जगदीशसिंग गाडी लावत असताना कंटेनर केबीच्या डाव्या विद्युत पोल असल्याचे दिसल्याने तो, कंटेनरच्या स्टिअरिंगवरुन खाली उतरला. खाली उतरून कंटेनरच्या पुढील भागाकडे जाऊन त्याने कंटेनरचा कोपरा विद्युत खांबाला अगदीच लागून येत असल्याचे पाहून जगदीशने परत गाडीत चढत कंटेनर पुढे घेण्याचा प्रयत्न करेल इतक्यात संपूर्ण लोखंडी कंटेनरमध्येच विद्युत प्रवाह उतरू चालक जगदीश जमिनीवर फेकला गेला.