DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

बॅकांनी योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी विशेष मोहीम राबवावी – जिल्हाधिकारी 

जिल्हास्तरीय बँक सल्लागार समन्वय समितीची बैठक संपन्न

जळगाव, बँकांशी संलग्न असलेल्या केंद्र व राज्य शासनाच्या योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी दिवाळीपर्यंत विशेष मोहीम राबविण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्ह्यातील सर्व प्रमुख राष्ट्रीयकृत बॅकेंच्या जिल्हा व्यवस्थापकांना दिल्या.

 

जिल्हास्तरीय बँक सल्लागार समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यावसायिक कर्जे, बचतगटांच्या कर्जाबाबत ही आढावा घेण्यात आला.

श्री.प्रसाद म्हणाले, पीएम स्वनिधी पोर्टलवरील पेंडन्सी दूर करण्याचे काम करण्यात यावे. प्रधानमंत्री मुद्रा योजनेत जास्तीत जास्त प्रस्ताव प्राप्त होतील यासाठी बँकानी प्रचार – प्रसाराचे काम करावे. प्राप्त प्रस्तावांची तात्काळ तपासणी करून अर्जदारांना लाभ देण्यात यावा. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेच्या पोर्टलवरील अडचणी दूर करण्यात याव्यात. स्टार्ट अप इंडिया योजनेत बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील इन्क्युबेशन सेंटरशी समन्वय साधून योजनेचा लाभ देण्याची कार्यवाही करावी.

प्रधानमंत्री जन-धन योजनेत नागरी स्थानिक संस्थेच्या समन्वयाने बँकिंग नसलेल्या क्लस्टर्ससह इतर क्षेत्रांमध्ये बँकिंग योजनांची व्याप्ती वाढविण्याचे काम करण्यात यावे. स्वयंसहाय्यता बचत गटांच्या कर्ज खात्यांना जास्तीत जास्त दुसरा आणि तिसरा डोस वितरण सुनिश्चित करण्यासाठी कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचना ही त्यांनी यावेळी दिल्या.

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत गटविकास अधिकारी व नगरपालिका मुख्याधिकारी यांच्या मार्फत प्राप्त जास्तीत जास्त कर्ज प्रस्ताव मंजूर करण्यात यावेत. सुकन्या समृद्धी योजनेचा जिल्ह्यातील शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये गटविकास अधिकारी, जिल्हा व तालुका शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत प्रचार-प्रसार करण्यात यावा. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत महिला बचतगटांना मदत करण्यासाठी जिल्ह्यातील १०० ठिकाणी बॅक सखी नियुक्त करावयाच्या आहेत. यासाठी बॅकांनी समन्वयाने कामकाज करावे.

शासनाच्या या योजनांची प्रभावी अंमलबजावणी व एक चांगला आराखडा तयार करण्यासाठी सर्व जिल्हा व्यवस्थापक, प्रमुख व समन्वयकांची २ नोव्हेंबर रोजी बैठक आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती ही जिल्हाधिकारी श्री.प्रसाद यांनी यावेळी दिली.
0000000

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.