DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

राज्यात ‘मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा’ आणि ‘मुख्यमंत्री सक्षम वॉर्ड स्पर्धा’

 

मुंबई,;- स्वच्छता अभियान केवळ कागदावर न राहता त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली पाहिजे. या अभियानाला चळवळीचे स्वरूप आले पाहिजे. स्वच्छता पंधरवडा अंतर्गत १ ऑक्टोबर रोजी प्रत्येकाने आपला एक तास स्वच्छतेसाठी द्यावा, असे आवाहन करतानाच राज्यात दि. १५ डिसेंबर २०२३ पर्यंत मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा आणि मुख्यमंत्री सक्षम वॉर्ड स्पर्धा राबविण्यात येणार असून लोकसहभागातून ते यशस्वी करावे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

 

स्वच्छता पंधरवडा-स्वच्छता ही सेवा अंतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनाच्या आदल्या दिवशी दि. १ ऑक्टोबरला स्वच्छतेसाठी एक तारीख एक तास हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्याबाबत आज दुरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून आढावा घेण्यात आला. मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्यासह विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यावेळी सहभागी झाले होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले, या अभियानासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धन्यवाद देतो. वर्षभरापूर्वी राज्यात स्वच्छ महाराष्ट्र नागरी अभियान-२ चा शुभारंभ केला. महाराष्ट्र कचरामुक्त आणि स्वच्छ असावा हे आपलं उद्दिष्ट्य आहे. स्वच्छतेच्या मंत्राची पंरपरा महाराष्ट्राला लाभलेली आहे. संत गाडगेबाबांनी हाती झाडू घेऊन स्वच्छतेचे धडे दिले आहेत. केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालयाने दि. १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२३ या काळात स्वच्छता पंधरवडा राबवायला सुरुवात केली आहे. संपूर्ण राज्यात हा उपक्रम यशस्वी करायचा असून त्यासाठी त्याचे नियोजन करा, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत हद्दीच्या बाहेरचा भागात नेहमी कचऱ्याचे ढीग, डेब्रीज टाकलेले असते. अशा महापालिका हद्दीबाहेरच्या जागा शोधून जिल्हाधिकाऱ्यांनी स्वच्छता मोहिम राबवावी त्यासाठी मुख्य सचिवांनी आढावा घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

‘स्वच्छता हीच सेवा’ हे अभियान महत्वाचे आहे. स्वच्छता फक्त कागदावर ठेऊ नका. प्रत्यक्ष फिल्डवर त्याचे काम दिसले पाहिजे. या उपक्रमात आपण १ ऑक्टोबरला आपापल्या गावात, शहरात, प्रत्येक वार्डात, प्रत्येक क्षेत्रात सकाळी १० वाजेपासून स्वच्छता मोहीम राबवावी. प्रत्येक वॉर्डात दोन ठिकाणी आणि ग्रामपंचायतीत एका ठिकाणी मोहीम राबविताना त्या त्या भागातील सर्व नागरिकांना सहभागी करून घ्यावे, जिथे खरोखरच कचरा आहे आणि स्वच्छतेकडे दुर्लक्ष झालेले आहे, अशा जागा शोधून काढा, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले यावेळी दिले.

अभियानांतर्गत सफाई मित्र, सुरक्षा शिबिरे आयोजित करून स्वच्छतेची गरज त्याची फायदे याचे महत्व पटवून द्या. एक तासाचे हे अभियान प्रतिकात्मक असून श्रमदानासाठी नागरिकांना सहभागी करून घ्यावे पण आपल्याला प्रशासन म्हणून स्वच्छतेचे काम दररोजच करायचे आहे असे सांगत अभियानानंतर १५ डिसेंबर २०२३ पर्यंत मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा आणि मुख्यमंत्री सक्षम वॉर्ड स्पर्धा ही सुद्धा मोठ्या प्रमाणावर यशस्वी करायची, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

हे अभियान शंभर टक्के यशस्वी करून देशात महाराष्ट्राचा पहिला क्रमांक कायम राहण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणेने ‘मिशन मोड’वर काम करावे, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.