डॉक्टरला अडवून मारहाण; १५ हजारांची रोकड हिसकावली
पारोळा : तालुक्यातील नगाव गावाच्या शिवारात एका डॉक्टरला भररस्त्यात अडवून मारहाण करत त्यांच्या खिशातील १५ हजार रुपयांची रोकड बळजबरीने हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार बुधवार, ४ मार्च रोजी रात्री ८ वाजता पारोळा पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. कैलास निळकंठ पाटील (वय ६०, रा. लोणी सिम, ता. पारोळा) हे १७ एप्रिल २०२५ रोजी दुपारी सुमारे ४ वाजता आपल्या दुचाकीने नगाव गावाच्या शिवारातून जात होते. त्यावेळी आरोपींनी त्यांच्या मारुती सुझुकी सेलेरियो (क्र. HH 46 BV 6048) कार डॉक्टरांच्या दुचाकीसमोर आडवी लावून त्यांचा मार्ग अडविला.

यानंतर कारमधून उतरलेल्या केतन दिलीप गोतरणे आणि त्याच्या चार साथीदारांनी “आमच्याविरुद्ध न्यायालयात दाखल केलेला खटला मागे का घेत नाहीस?” असे म्हणत डॉक्टरांना शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपींनी डॉक्टरांच्या शर्टची कॉलर पकडून त्यांना दुचाकीवरून खाली ओढले आणि लाथाबुक्क्यांसह चपलेने बेदम मारहाण केली. मारहाणी दरम्यान डॉक्टरांचा शर्ट फाडून त्यांच्या खिशातील १५ हजार रुपयांची रोकड जबरदस्तीने काढून घेतली. तसेच त्यांना ठार मारण्याची धमकीही दिली.
या घटनेप्रकरणी डॉ. पाटील यांनी न्यायालयात धाव घेतली होती. माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार पारोळा पोलिसांनी आरोपी केतन दिलीप गोतरणे, दमयंती दिलीप गोतरणे, साक्षी संतोष भोईर तसेच इतर दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश महाजन करत आहेत.