महाराष्ट्रात उष्णतेचा कहर; पुढील दोन दिवस तापमान आणखी वाढणार
मुंबई, ठाणे, पालघरला ‘यलो’ अलर्ट; अमरावतीत पारा ४०.८ अंशांवर
मुंबई : मुंबईमध्ये दोन दिवसांच्या कमालीच्या उष्ण झळांनंतर शुक्रवारी मुंबईकरांना तापमानात थोडा दिलासा मिळाला. मात्र हा दिलासा केवळ दोन दिवसांपुरताच असणार आहे. ८ आणि ९ मार्च रोजी महामुंबई परिसरामध्ये पुन्हा उष्ण आणि दमट वातावरणाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईत सांताक्रूझ येथे शुक्रवारी ३४.६ तर, कुलाबा येथे ३२ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. दोन्ही केंद्रांवरील पारा सरासरीपेक्षा चार अंशांनी खाली उतरला होता. मात्र किमान तापमानात शुक्रवारी मोठी वाढ झाली.
कुलाबा येथे शुक्रवारी २५.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. तर, सांताक्रूझ येथे २३.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. या दोन्ही केंद्रांवरील किमान तापमान हे सरासरीपेक्षा अनुक्रमे ३.४ आणि ३.७ अंशांनी अधिक होते. कोकण विभागाजवळ निर्माण झालेली प्रत्यावर्ती चक्रीय वातस्थितीची प्रणाली महाराष्ट्राच्या अंतर्भागाकडे सरकली असून याचा परिणाम शुक्रवारी उत्तर महाराष्ट्राच्या तापमानावर झाला.
उत्तर महाराष्ट्रात मालेगाव येथे ३७.४, नाशिक येथे ३६.६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. येणाऱ्या आठवड्यामध्येही ही परिस्थिती कायम राहू शकते. या पार्श्वभूमीवर रविवार ८ आणि सोमवार ९ मार्च रोजी पालघर, ठाण्यासह मुंबईमध्ये उष्ण आणि दमट वातावरणाचा यलो ॲलर्ट देण्यात आला आहे. रविवारी पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड येथे तर ९ मार्च रोजी पालघर, ठाणे आणि मुंबई येथे हा ॲलर्ट देण्यात आला आहे.

अमरावतीमध्ये पारा ४०.८ वर
विदर्भासाठी सध्या एकही इशारा देण्यात आलेला नाही. मात्र विदर्भाचेही तापमान वाढायला सुरुवात झाली आहे. राज्यात शुक्रवारी सर्वाधिक कमाल तापमान अमरावती येथे ४०.८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. हे तापमान सरासरीपेक्षा ६.३ अंशांनी अधिक होते अकोला येथे ४०.७ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले गेले. मराठवाड्यातही कमाल तापमान वाढत असून परभणी येथे ३८.५ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले गेले. तर उत्तर मध्य महाराष्ट्र वगळता उर्वरित मध्य महाराष्ट्रात सोलापूर येथे ३९.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.