DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

चोपड्यात गॅसचा तुटवडा की काळाबाजार? नागरिकांकडून गंभीर आरोप

चोपडा : इराण-इस्रायल युद्धामुळे देशभरात इंधन आणि गॅस पुरवठ्याबाबत अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिस्थितीचा गैरफायदा घेत चोपडा शहरातील काही गॅस एजन्सींमार्फत ग्राहकांची आर्थिक पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. गॅस सिलिंडर उपलब्ध नसल्याचे कारण देत ग्राहकांना परत पाठवले जात असतानाच दुसरीकडे जास्त दराने सिलिंडर विक्री होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

शहरातील मध्यवर्ती भागातील एका गॅस एजन्सीवर दररोज सकाळपासूनच ग्राहकांच्या मोठ्या रांगा लागतात. घरगुती गॅस घेण्यासाठी महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच कामगार वर्ग मोठ्या संख्येने एजन्सीकडे येतो. मात्र “गॅसची गाडी आलेली नाही” किंवा “साठा संपला आहे” अशी कारणे देत अनेक ग्राहकांना रिकाम्या हाताने परत जावे लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, एजन्सीशी संबंधित काही व्यक्ती किंवा मध्यस्थांमार्फत गॅस सिलिंडर जादा दराने उपलब्ध करून दिले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. अधिकृत दरापेक्षा जास्त पैसे घेऊन सिलिंडर दिले जात असून काही ठिकाणी ११०० ते १२०० रुपयांपर्यंत दर आकारले जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सामान्य ग्राहकांची आर्थिक अडचण वाढत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

या प्रकारामुळे शहरात प्रशासनाचा वचक नसल्याचे चित्र दिसून येत असल्याची टीका नागरिकांकडून केली जात आहे. अत्यावश्यक वस्तू असलेल्या गॅसच्या पुरवठ्यात अशा प्रकारे अनियमितता होत असल्याने प्रशासनाने तातडीने लक्ष घालण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

या पार्श्वभूमीवर तहसीलदार भाऊसाहेब थोरात तसेच पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. तसेच गॅसचा नियमित व पारदर्शक पुरवठा सुरू करावा, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.

पेट्रोल पंपांवरही तक्रारी

दरम्यान, शहरातील काही पेट्रोल पंपांवर पेट्रोल उपलब्ध असूनही “पेट्रोल संपले” असे सांगून वाहनधारकांना परत पाठवले जात असल्याच्या तक्रारीही पुढे येत आहेत. यामुळे वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागत असून संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.