DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

निकृष्ट कामावरून अभियंत्यांची झाडाझडती, रस्ते कामात सुधारणेचे आदेश

महापौर दीपमाला काळे यांनी केली बहिणाबाई चौकात पाहणी

​जळगाव : शहरात सुरू असलेल्या रस्ते डागडुजी अभियानांतर्गत कामांमध्ये अनियमितता आणि संथगती दिसून येत असल्याने महापौर दीपमाला काळे यांनी बुधवारी सकाळी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. कवयित्री बहिणाबाई चौधरी उद्यानापासून जिल्हा पेठ पोलीस स्टेशनपर्यंतच्या रस्त्यावर पावसाच्या पाण्यामुळे पडलेल्या खड्ड्यांची तक्रार नागरिकांनी महापौरांकडे केली होती. या पार्श्वभूमीवर महापौरांनी आक्रमक पवित्रा घेत अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

​रस्ते डागडुजी आणि पेव्हर ब्लॉक बसवण्याचे काम सुरू असताना, हे काम केवळ रिंग रोड आणि जिल्हा पेठेकडच्या काही ठराविक भागातच झाल्याचे समोर आले होते. उर्वरित रस्त्याची दुरवस्था कायम असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या. याची दखल घेत महापौर दीपमाला काळे यांनी बुधवारी दि. १८ रोजी सकाळी प्रत्यक्ष कामाची पाहणी केली.

​पाहणीदरम्यान महापौरांनी शहर अभियंता योगेश बोरोले आणि योगेश वाणी यांच्याकडून कामाचा सविस्तर आढावा घेतला. कामाचा दर्जा आणि व्याप्ती याबद्दल त्यांनी अधिकाऱ्यांना कडक सूचना दिल्या. यावेळी महापौरांनी विविध बाबींवर भर दिला. केवळ ठराविक भागात काम न करता, नागरिकांच्या मागणीनुसार रस्त्याची लांबी आणि रुंदी वाढवून पूर्ण पट्टा दुरुस्त करावा. पेव्हर ब्लॉक आणि डागडुजीचे काम उत्तम दर्जाचे असावे, जेणेकरून पावसाळ्यात पुन्हा खड्डे पडणार नाहीत.

​रेंगाळलेली कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले. ​या पाहणी दौऱ्यावेळी नगरसेविका ॲड. शुचिता हाडा यांच्यासह महानगरपालिकेचे कर्मचारी उपस्थित होते. महापौरांच्या या आक्रमक भूमिकेमुळे आता तरी प्रलंबित रस्त्यांची कामे मार्गी लागतील, अशी आशा नागरिक व्यक्त करत आहेत.

“नागरिकांच्या पैशातून होणारी कामे दर्जेदारच असायला हवीत. कामात कसलीही हलगर्जी खपवून घेतली जाणार नाही. तक्रारी प्राप्त होताच आम्ही प्रत्यक्ष पाहणी करून त्रुटी दूर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.”
— दीपमाला काळे, महापौर

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.