DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

जळगाव महानगरपालिकेत गुढीपाडव्याचा उत्साह

महापौर दीपमाला काळे यांच्या संकल्पनेतून उभारली जाणार गुढी, शहरातील पुतळ्यांची झाली स्वच्छता, ३ दिवस रोषणाई

जळगाव : मराठी नववर्ष आणि गुढीपाडव्याचे औचित्य साधून जळगाव शहर महानगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच गुरुवारी, १९ मार्च रोजी सकाळी १० वाजता मोठ्या उत्साहात गुढी उभारली जाणार आहे. महापौर दीपमाला काळे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात येत असून, यानिमित्त मनपा प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे.

गुरुवारी सकाळी १० वाजता महानगरपालिकेच्या मुख्य प्रांगणात हा गुढीपूजन सोहळा पार पडणार आहे. या मंगलमय प्रसंगी महानगरपालिकेचे सर्व सन्माननीय नगरसेवक, पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नववर्षाचे स्वागत करतील. गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला जळगाव शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांची विशेष स्वच्छता करण्यात आली आहे. या सर्व पुतळ्यांना माल्यार्पण करून अभिवादन करण्यात येत आहे.

शहराच्या सांस्कृतिक वारशाचा सन्मान राखण्यासाठी हा विशेष उपक्रम हाती घेण्यात आला आहे. गुढीपाडव्यापासून ते महानगरपालिकेच्या स्थापना दिनापर्यंत शहरात उत्सवाचे वातावरण राहणार आहे. १९ ते २१ मार्च या दरम्यान महानगरपालिका इमारत आणि शहरातील मुख्य परिसरांमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. नववर्ष आणि स्थापना दिन असा दुहेरी आनंद जळगावकर या काळात अनुभवणार आहेत.

“मराठी संस्कृतीचे जतन आणि महापुरुषांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व जळगावकरांनी या उत्सवात सहभागी व्हावे.”
— दीपमाला काळे, महापौर, जळगाव महानगरपालिका.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.