DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या भवानी पेठ मुक्कामाचा निर्णय लांबणीवर

आळंदी : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पायी वारी पालखी सोहळ्याचा पुणे येथील भवानी पेठ मंदिर मुक्कामाबाबतचा निर्णय अद्याप प्रलंबित ठेवण्यात आला असून हा निर्णय पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आळंदी देवस्थानकडून देण्यात आली आहे. मुक्काम इतरत्र हलविणे किंवा सध्याच्या ठिकाणी आवश्यक सोयी-सुविधांबाबत ठोस अधिकृत हमी देणारा प्रस्ताव कोणाकडूनही प्राप्त झालेला नसल्यामुळे हा निर्णय पुढे ढकलण्यात आल्याचे देवस्थानने स्पष्ट केले आहे.

देवस्थानकडून भवानी पेठ येथील मुक्कामाच्या ठिकाणी उपलब्ध सोयी-सुविधांबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच भवानी पेठ पालखी विठ्ठल मंदिर विश्वस्त यांच्यासोबत बैठक घेण्यात आली. या बैठकीत आवश्यक त्या उपाययोजना देवस्थानतर्फे सुचविण्यात आल्या. मात्र १२ एप्रिलपर्यंत मुक्कामाबाबत कोणताही ठोस अधिकृत हमी देणारा प्रस्ताव प्राप्त न झाल्याने संस्थान समितीला पालखी सोहळा दिंडी समाजाला निश्चित माहिती देता आलेली नाही.

दरम्यान, प्रशासन, लोकप्रतिनिधी, भवानी पेठ पालखी विठ्ठल मंदिर विश्वस्त, दिंडी संघटना पदाधिकारी, श्रीगुरु हैबतरावबाबा यांचे वंशज प्रतिनिधी, श्रीमंत उर्जितसिंह शितोळे सरकार मानकरी, सेवेकरी तसेच संस्थान विश्वस्त यांची संयुक्त बैठक प्रशासनाच्या वतीने पुढील आठ दिवसांत आयोजित करण्यात येणार आहे.

या बैठकीत सुविधांबाबत व आवश्यक उपाययोजनांबाबत अधिकृत प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर तो प्रस्ताव २६ एप्रिल रोजी पंढरपूर मुक्कामी पालखी सोहळा दिंडी समाजासमोर चर्चेसाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर १ मे रोजी आळंदी येथे आषाढी वारीची कार्यक्रमपत्रिका जाहीर करण्यात येईल, अशी माहिती सोहळा प्रमुख ॲड. राजेंद्र उमाप, प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, विश्वस्त चैतन्य महाराज लोंढे कबीर बुवा, विश्वस्त योगी निरंजननाथ, विश्वस्त पुरुषोत्तम महाराज पाटील तसेच विश्वस्त ॲड. रोहिणी पवार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.