उन्हाळ्यात गोड आणि रसरशीत खरबूज कसे निवडाल? जाणून घ्या सोप्या टिप्स
उन्हाळ्याच्या दिवसात शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी पाणी आणि फळांचे सेवन अत्यंत आवश्यक असते. या ऋतूमध्ये मिळणारे खरबूज हे केवळ थंडावा देणारे फळ नसून आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर मानले जाते. मात्र बाजारात मिळणारे प्रत्येक खरबूज गोड आणि रसरशीत असेलच असे नाही. त्यामुळे खरबूज खरेदी करताना काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
असे ओळखा पिकलेले खरबूज
खरबूज खरेदी करताना सर्वप्रथम त्याचा खालचा भाग तपासावा. जर खालचा भाग गडद पिवळसर किंवा केशरी रंगाचा असेल तर ते फळ चांगले पिकलेले असण्याची शक्यता असते. मात्र खालचा भाग फिकट रंगाचा दिसत असेल तर ते खरबूज कच्चे असू शकते. याशिवाय फळाला हलका गोड सुगंध येत असेल तर ते पिकलेले आणि गोड असण्याची शक्यता जास्त असते.

सालीचा रंग आणि वजन तपासा
पिकलेल्या खरबुजाचा रंग साधारणपणे फिकट पिवळा किंवा पिवळसर-हिरवा असतो आणि त्यावर हिरव्या रेषा दिसतात. जर खरबूज पूर्णपणे हिरवे दिसत असेल तर ते खरेदी करणे टाळावे. वजनाच्या बाबतीत हलके खरबूज सहसा अधिक गोड आणि रसरशीत असते. खूप जड खरबुजात बिया अधिक असण्याची शक्यता असते आणि त्यात गोडवा कमी असू शकतो. तसेच अतिशय मऊ किंवा दबलेले खरबूज खराब असण्याची शक्यता असल्याने ते घेणे टाळावे.
खरबूज साठवण्याची योग्य पद्धत
खरबूज घरी आणल्यानंतर ते काही काळ खोलीच्या तापमानात ठेवता येते. मात्र फळ कापल्यानंतर उरलेला भाग एअरटाइट डब्यात ठेवून फ्रिजमध्ये ठेवावा. यामुळे ते अधिक काळ ताजे राहते. खरबुजाचा तीव्र वास इतर फळांवर परिणाम करू शकतो, त्यामुळे ते इतर फळांपासून वेगळे ठेवणे योग्य ठरते.
बियाही ठरतात उपयुक्त
अनेकजण खरबुजाच्या बिया फेकून देतात. मात्र या बिया धुवून वाळवल्यानंतर त्या विविध पदार्थांमध्ये वापरता येतात. त्यामध्ये पोषक घटकही भरपूर प्रमाणात असतात. उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारे आणि पोषणमूल्यांनी भरलेले खरबूज खरेदी करताना या सोप्या टिप्स लक्षात ठेवल्यास गोड, ताजे आणि रसरशीत फळ सहज निवडता येईल.