जळगाव : शहरासह संपूर्ण जिल्ह्यात उष्णतेची लाट आणखी तीव्र झाली असून तापमान सलग काही दिवसांपासून ४२ अंश सेल्सिअसच्या वर कायम आहे. एप्रिल महिन्याच्या मध्यावरच उन्हाने आक्रमक रूप धारण केल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. प्रखर उन्हामुळे दुपारच्या वेळेत रस्त्यांवर शांतता पसरलेली दिसून येत असून दैनंदिन व्यवहारांवर मोठा परिणाम होत आहे.
गेल्या काही दिवसांत तापमानात सातत्याने वाढ होत असून सकाळपासूनच उष्णतेचा त्रास जाणवू लागतो. विशेषतः दुपारी १२ ते ४ या कालावधीत उन्हाची तीव्रता कमाल पातळीवर पोहोचत असल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे टाळावे लागत आहे. मागील २४ तासांत कमाल तापमान ४२.२ अंश सेल्सिअस नोंदवले गेले, तर किमान तापमानही २४.३ अंशांवर पोहोचले आहे. त्यामुळे रात्रीदेखील उकाड्यामुळे झोपेचा त्रास होत आहे.

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस तापमान ४१ ते ४३ अंशांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे उष्णतेपासून दिलासा मिळण्याची शक्यता सध्या कमीच आहे.
दरम्यान, वाढत्या उकाड्यामुळे रुग्णालयांमध्ये उष्माघात, डोकेदुखी, चक्कर येणे तसेच निर्जलीकरणाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना दुपारच्या वेळेत अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर न पडण्याचे, पुरेसे पाणी पिण्याचे आणि उन्हापासून संरक्षण करण्याचे आवाहन केले आहे.