DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

जळगावकरांनो सावधान! तापमान ४४ पार, पुढील ४८ तास उष्णतेचा तडाखा

पुढील २ दिवस जपून! जळगावमध्ये उष्णतेचा कहर वाढणार

जळगाव  – शहरासह संपूर्ण जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असून नागरिक अक्षरशः होरपळून निघत आहेत. गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असून गुरुवारी (१६ एप्रिल) मोसमातील उच्चांकी ४३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मात्र, पुढील ४८ तास आणखी कठीण ठरणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, १७ आणि १८ एप्रिल रोजी तापमान ४४ अंशांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. उष्णतेची लाट अधिक तीव्र होणार असल्याने प्रशासनाने नागरिकांना दुपारच्या वेळेत घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, उष्णतेच्या तडाख्यानंतर हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. १९ एप्रिलपासून ४० ते ५० किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. २० ते २३ एप्रिलदरम्यान ढगाळ वातावरण राहून अधूनमधून वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तापमानात काही प्रमाणात घट होऊन नागरिकांना दिलासा मिळू शकतो.

तथापि, हा दिलासा तात्पुरता असण्याची शक्यता असून २५ एप्रिलपासून पुन्हा एकदा उष्णतेची लाट सक्रिय होण्याचा अंदाज आहे. वाढत्या तापमानामुळे ‘उष्माघाताचा’ धोका वाढला असून नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज:

  • १७ एप्रिल : ४४°C – उष्णतेची लाट (यलो अलर्ट)
  • १८ एप्रिल : ४४°C – उष्णतेची लाट (यलो अलर्ट)
  • १९ एप्रिल : ४१°C – दुपारनंतर वादळी वाऱ्यासह पाऊस
  • २० एप्रिल : ३९°C – ढगाळ वातावरण, वादळी पाऊस
  • २१ एप्रिल : ३९°C – ढगाळ वातावरण, वादळी पावसाची शक्यता

सध्या कोरड्या हवामानामुळे उष्णतेची तीव्रता अधिक जाणवत असून दुपारच्या वेळी रस्ते ओस पडत आहेत. हवामान तज्ज्ञांच्या मते, उत्तर भारतातून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे खान्देशात तापमानाचा पारा झपाट्याने वाढला आहे.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.