नव्या संसाराची सुरुवातच ठरली अखेरची यात्रा : भीषण अपघातात नववधूसह तिघांचा मृत्यू
धरणगाव : तालुक्यातील वराड गावाजवळ बुधवारी सकाळी सुमारे 9 वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघाताने परिसरात खळबळ उडाली. वापी (गुजरात) येथून अकोल्याकडे जात असलेल्या क्रूझर गाडीचे चाक चालू अवस्थेत निखळल्याने गाडी पलटी झाली. या दुर्घटनेत नववधूसह तिघांचा जागीच मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अकोला येथील पूजा रवी वागडकर (वय 22) हिचा विवाह नुकताच गुजरातमधील वापी येथे झाला होता. लग्नानंतर पहिल्यांदाच ती आपल्या नातेवाईकांसह माहेरी अकोल्याला परतत होती. कुटुंबात आनंदाचे वातावरण असतानाच हा दुर्दैवी प्रसंग ओढवला.
बुधवार, दि. 29 एप्रिल रोजी सकाळी क्रूझर गाडी (क्रमांक MH 30 AZ 4710) वराड गावाजवळून जात असताना अचानक गाडीचे एक चाक निखळले. गाडीचा वेग अधिक असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडी उलटली. या भीषण अपघातात नववधू पूजा वागडकर, दत्तू तुळशीराम भागवत (वय 42) आणि जगदीश चंद्रभान वागडकर (वय 52) यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे वागडकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून लग्नाच्या आनंदावर शोककळा पसरली आहे.
अपघातात सहा जण गंभीर जखमी झाले असून त्यामध्ये प्रेम भारत वाकडकर (वय 24), नितेश सुरेश काठोडे (वय 35), अमोल दामोदर गीते (वय 35), रवी प्रभाकर वाघोडकर (वय 32), तुळशीराम भीमराव भागवत (वय 67) आणि 14 वर्षीय अंश नितेश काठोडे यांचा समावेश आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. जखमींना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांकडून शोक व्यक्त केला जात आहे.