DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

गिरणा नदीत बैलगाडी उलटली; कष्टकरी शेतकऱ्याचा बुडून दुर्दैवी मृत्यू

जळगाव – तालुक्यातील गिरणा नदी पात्रात बैलगाडी उलटून एका शेतमजुराचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी सकाळी घडली. दिलीप रामभाऊ कल्याणकर (वय ५५, रा. वडनगरी) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गिरणा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा होत असल्याने नदीत ठिकठिकाणी खोल खड्डे निर्माण झाले आहेत. वडनगरी येथील रहिवासी दिलीप कल्याणकर आणि त्यांचे सहकारी चिंतामण नाईक हे दोघे दररोजप्रमाणे खेडी भोकर शिवारातील शेतात मजुरीसाठी जात होते.

मंगळवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास त्यांची बैलगाडी गिरणा नदी पात्रातून जात असताना खोल खड्ड्याचा अंदाज न आल्याने अचानक बैलगाडी उलटली. प्रसंगावधान राखत चिंतामण नाईक यांनी तत्काळ गाडीतून उडी मारून स्वतःचा जीव वाचवला. मात्र, दिलीप कल्याणकर यांना बाहेर पडता न आल्याने ते खोल पाण्यात बुडाले.

घटनेची माहिती मिळताच जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने शोध व बचावकार्य सुरू करण्यात आले. जवळपास तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर दिलीप कल्याणकर यांचा मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आला. मृतदेह बाहेर येताच नातेवाईकांनी केलेला आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले.

या अपघातात बैलगाडीतील एका बैलाचा देखील पाण्यात बुडून मृत्यू झाला असून दुसरा बैल बचावला आहे. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान, गिरणा नदी पात्रातील अवैध वाळू उपशामुळे निर्माण झालेल्या खोल खड्ड्यांमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होत असल्याची चर्चा परिसरात सुरू झाली आहे.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.