DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

पिंपळगाव पोलिसांची गावठी हातभट्टीवर धडक कारवाई; लाखो रुपयांचे रसायन नष्ट

पाचोरा – तालुक्यातील शिंदाड परिसरात पिंपळगाव हरे पोलिसांनी गावठी हातभट्टीवर मोठी कारवाई करत तब्बल लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट केला. महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये करण्यात आलेल्या या कारवाईमुळे अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

पहिली कारवाई 11 मे 2026 रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास शिंदाड येथील गवले धरणालगत करण्यात आली. याप्रकरणी पोकों/1873 प्रशांत नाना पाटील यांनी फिर्याद दिली असून, रहेमान सुपडू तडवी (रा. शिंदाड, ता. पाचोरा) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी घटनास्थळावरून फरार झाला.

या कारवाईत पोलिसांनी सुमारे 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यात 1200 लिटर गुळ-नवसागर मिश्रित कच्चे रसायन, 100 लिटर उकळते रसायन तसेच 50 लिटर तयार गावठी दारूचा समावेश होता.

त्यानंतर सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास त्याच परिसरात दुसरी कारवाई करण्यात आली. पोकों/610 नामदेव रविंद्र इंगळे यांच्या फिर्यादीवरून बुधा दगडू तडवी (रा. शिंदाड, ता. पाचोरा) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

या दुसऱ्या कारवाईत 48 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात 800 लिटर कच्चे रसायन, 100 लिटर उकळते रसायन आणि 30 लिटर तयार गावठी दारूचा समावेश होता. दोन्ही कारवाईत मिळून मोठ्या प्रमाणावर गावठी हातभट्टीचे साहित्य व रसायन नष्ट करण्यात आले.

ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल रामनाथ पवार, पोहेकॉ अतुल सुभाष पवार, पोकों प्रशांत नाना पाटील, अमोल सुरेश पाटील आणि नामदेव इंगळे यांच्या पथकाने केली.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.