सामाजिक उपक्रमांनी गिरीशभाऊंचा वाढदिवस साजरा
जळगाव : भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या ६६ व्या वाढदिवसानिमित्त आज १७ मे रोजी भाजप जळगाव महानगरतर्फे शहरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभर शहरातील विविध भागांत सेवा, अन्नदान, रक्तदान, वृक्षारोपण व जनजागृतीपर कार्यक्रम राबवून वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
सकाळी ८.३० वाजता मंडळ क्र. २ संत झुलेलाल व बहिणाबाई मंडळातर्फे शाहूनगर येथील हनुमान मंदिर परिसरात गोसेवा उपक्रमांतर्गत गाईंना चारा वाटप करण्यात आले. त्यानंतर सकाळी ९ वाजता जी.एम. फाऊंडेशन, भाजप युवा मोर्चा, जळगाव महानगर व कामगार मोर्चातर्फे भाजप कार्यालयात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले.

सकाळी ९.३० वाजता महानगरपालिका समोर केमिस्ट आघाडीतर्फे नागरिकांना ‘ओआरएस’चे वाटप करण्यात आले, तर ९.४५ वाजता हॉकर्स आघाडीकडून बळीराम पेठ येथे कापडी पिशव्यांचे वितरण करण्यात आले.
सकाळी १० वाजता महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते सागर पार्क येथे वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. त्यानंतर १०.१५ वाजता बालनिरीक्षण व सुधारगृह येथे विद्यार्थ्यांना शालेय बॅगचे वाटप करण्यात आले.
सकाळी १०.३० वाजता शहराचे आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते शासकीय रुग्णालयात अन्नदान व फळवाटप करण्यात आले. तसेच सकाळी ११ वाजता मंडळ क्र. ३ सरदार वल्लभभाई पटेल मंडळातर्फे संत गाडगेबाबा निराधार केंद्र येथे अन्नदान कार्यक्रम झाला.
सकाळी ११.३० वाजता मंडळ क्र. १ छत्रपती शिवाजी महाराज मंडळाकडून पांजरा पोळ गोशाळा येथे गुरांना चारादान करण्यात आले. यावेळी गोसेवकांचा सत्कारही करण्यात आला. सकाळी ११.४५ वाजता अयोध्यानगर येथे नगरसेविका सौ. वंदना संतोष इंगळे यांच्या हस्ते पाण्याचे माठ वाटप करण्यात आले.
दुपारी १२ वाजता नगरसेवक प्रकाश बालानी व रमेश मतानी यांनी सिंधी कॉलनी येथील सेवा मंडळात वृद्धांना फळवाटप केले. त्यानंतर १२.१५ वाजता मंडळ क्र. ४ प्रभू श्रीराम अयोध्या मंडळातर्फे इच्छादेवी चौक येथे मालवाहतूक रिक्षा चालकांना रुमाल वाटप करण्यात आले. दुपारी १२.३० वाजता मंडळ क्र. ५ महाराणा प्रताप मंडळातर्फे हुडको-पिंप्राळा येथे अन्नदान व मिठाई वाटप करण्यात आले.
सायंकाळी ५ वाजता मंडळ क्र. १ छत्रपती शिवाजी महाराज मंडळाकडून जुना आसोदा रोड, बहिणाबाई नगर येथे वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. याशिवाय प्रत्येक मंडळात विविध ठिकाणी वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आले.
या सर्व कार्यक्रमांना आमदार सुरेश भोळे, जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, महापौर दीपमाला काळे, माजी अध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे, गटनेते प्रकाश बालानी तसेच भाजपचे पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन जिल्हा चिटणीस मिलिंद गोविंद चौधरी यांनी केले.