DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञांच्या टीमचे यश

जळगाव : अमळनेर येथील अवघ्या तीन महिन्यांच्या बालिकेवर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांनी यशस्वी उपचार करून तिचे प्राण वाचविले आहेत. गंभीर अवस्थेत व्हेंटीलेटरवर दाखल करण्यात आलेल्या या शिशुला दहा दिवसांच्या अथक उपचारांनंतर नवजीवन मिळाले असून सध्या तिची प्रकृती पूर्णपणे धोक्याबाहेर आहे.
याबाबत माहिती अशी की, अमळनेर येथील मोनीस हारून शेख यांच्या तीन महिन्यांच्या बालिकेला काही दिवसांपासून तीव्र ताप येत होता. त्यासोबतच तिला वारंवार झटके येण्यास सुरुवात झाली. प्रकृती बिघडत असल्याने कुटुंबीयांनी तिला तातडीने धुळे येथील रुग्णालयात दाखल केले. तेथे तिची स्थिती अत्यंत गंभीर असल्याने कृत्रिम श्वासोच्छ्वास यंत्रणेवर (व्हेंटीलेटर) ठेवण्यात आले. मात्र प्रकृतीत अपेक्षित सुधारणा होत नसल्याने आणि अधिक प्रगत उपचारांची आवश्यकता असल्याने तिला हायर सेंटर असलेल्या डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात हलविण्यात आले. रुग्णालयात दाखल होताच एनआयसीयू व पीआयसीयू विभागातील तज्ज्ञ डॉ. सुयोग तन्नीरवार, डॉ. उमाकांत अणेकर यांनी बालिकेची सखोल तपासणी सुरू केली. बालिकेच्या पाठीतील पाणी तपासणी, मेंदूचा एमआरआय तसेच विविध रक्त तपासण्या करण्यात आल्या. या तपासण्यांच्या आधारे बालिकेला ‘एनसेफेलायटीस’ (मेंदूची सूज) हा गंभीर आजार झाल्याचे निदान झाले. निदान स्पष्ट झाल्यानंतर तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. ओमश्री गुडे, डॉ. कुशल धांडे, डॉ. विशाल कोठावडे, डॉ. नवेद खान, डॉ. मिमोनी कुंभारे, डॉ. सृष्टी भिरूड, डॉ. अस्मिता गायकवाड, डॉ. निशीगंधा सोनवणे, डॉ. भारती झोेपे या टीमने तत्काळ उपचार पद्धतीत बदल करून प्रतिबंधात्मक औषधांचा डोस वाढविला. बालरोगतज्ज्ञ, अतिदक्षता विभागातील डॉक्टर, परिचारिका आणि तंत्रज्ञ यांनी सातत्याने बालिकेवर लक्ष ठेवत उपचार सुरू ठेवले. उपचारांना सकारात्मक प्रतिसाद मिळत गेल्याने बालिकेची प्रकृती हळूहळू सुधारू लागली. दहा दिवसांच्या उपचारांनंतर तिला व्हेंटीलेटरमधून बाहेर काढण्यात आले आणि अखेर तिची प्रकृती पूर्णपणे धोक्याबाहेर आली.विशेष म्हणजे या बालिकेवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार करण्यात आले. त्यामुळे कुटुंबीयांना कोणताही आर्थिक भार सहन करावा लागला नाही. गंभीर अवस्थेतील शिशुला वेळेवर योग्य निदान आणि अत्याधुनिक उपचार मिळाल्याने तिचे प्राण वाचविणे शक्य झाले. पीआयसीयू विभागातील हिरामण लांडगे यांनीही कागदपत्राच्या पूर्ततेसाठी सहकार्य केले.

 

बालिका आमच्याकडे अत्यंत गंभीर अवस्थेत दाखल झाली होती. तिला ताप आणि झटक्यांसह श्वसनाचा त्रासही होता. आवश्यक तपासण्यांमधून एनसेफेलायटीसचे निदान झाल्यानंतर त्वरित उपचार सुरू करण्यात आले. आमच्या एनआयसीयू व पीआयसीयू टीमच्या समन्वित प्रयत्नांमुळे बालिकेची प्रकृती सुधारली आणि तिला नवजीवन देता आले. लहान मुलांमध्ये तापासोबत झटके किंवा असामान्य लक्षणे दिसल्यास पालकांनी तातडीने तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
– डॉ. नवेद खान, डॉ. उल्हास पाटील रूग्णालय.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.