जळगावसह राज्यभर अवकाळी पावसाचा धुमाकूळ; बारामतीत महिलेचा मृत्यू, अनेक ठिकाणी नुकसान
जळगाव : राज्यातील विविध भागांप्रमाणे जळगाव जिल्ह्यातही मंगळवारी (२ जून) वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. जळगाव शहरात उपनिबंधक कार्यालयासमोर सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान वादळी वाऱ्यामुळे मंडप आंदोलकांच्या अंगावर कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दरम्यान, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे जनजीवन विस्कळीत झाले. काही ठिकाणी नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला, तर काही भागांत मोठे नुकसान झाले.
बारामतीत भिंत कोसळून महिलेचा मृत्यू
पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात माळवाडी येथे वादळी पावसापासून बचावासाठी पत्र्याच्या शेडमध्ये आश्रय घेतलेल्या दोन महिलांवर भिंत कोसळली. या दुर्घटनेत नंदा लडकत यांचा मृत्यू झाला, तर दुसरी महिला किरकोळ जखमी झाली. या दुर्घटनेत शेडमध्ये असलेल्या १३ ते १५ शेळ्यांचाही मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे संबंधित कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

करंजीच्या आठवडे बाजारात गोंधळ
अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी येथे भरलेल्या आठवडे बाजारावर अचानक आलेल्या वादळी पावसाने अक्षरशः कहर केला. भाजीपाला विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांचा माल पावसात भिजून खराब झाला, तर वादळी वाऱ्यामुळे ताडपत्र्या, प्लास्टिक शेड आणि छत्र्या उडून गेल्याने बाजारपेठेत एकच गोंधळ उडाला.
नाशिकमध्ये पावसाची दमदार हजेरी
नाशिक शहरात दुपारच्या सुमारास झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. गेल्या काही दिवसांपासून उष्णता आणि उकाड्याने त्रस्त असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. पावसामुळे तापमानात घट झाली असून पुढील काही दिवस हवामानात बदल कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
शेती, पशुधन आणि मालमत्तेचे नुकसान
अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे राज्यातील अनेक भागांमध्ये शेतीपिके, फळबागा, पशुधन तसेच मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रशासनाकडून पंचनाम्याची प्रक्रिया सुरू असून नुकसानग्रस्तांना मदत देण्याची मागणी जोर धरत आहे.