जळगाव – भुसावळ शहरातील बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेली मोठी घरफोडी अवघ्या 12 तासांच्या आत उघडकीस आणण्यात जळगाव स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी नागपूर येथून परराज्यातील 3 अट्टल आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून चोरीला गेलेला 16 लाख 34 हजार रुपये किमतीचा सोन्या-चांदीचा ऐवज आणि रोख रक्कम हस्तगत केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, भुसावळ येथील फिर्यादी दि. 31 मे रोजी कामानिमित्त बाहेर गेले असताना, अज्ञात चोरांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड लंपास करून चोरटे पसार झाले होते. दि. 1 जून रोजी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच, घटनेचे गांभीर्य ओळखून जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना समांतर तपास करण्याचे आदेश दिले. एलसीबीच्या पथकाने तात्काळ घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पडताळणी केली. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या अचूक माहितीच्या आधारे, हे चोरटे नागपूर शहरात असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली. जळगाव पोलिसांनी वेळ न गमावता नागपूर पोलिसांच्या मदतीने नागपुरातून तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये राजू जसपालसिंग (वय 42, रा. हरियाणा), भोला उर्फ बिरेंद्र सुखदेव पासवान (वय 40, रा. बिहार) आणि राजेश पारस शहा (वय 52, रा. बिहार) यांचा समावेश आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून गुन्ह्यातील संपूर्ण 16,34,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून पुढील तपास भुसावळ पोलीस करत आहेत.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, उपनिरीक्षक शरद बागल व त्यांच्या पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी बजावली.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.