DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

विधान परिषद निवडणूक २०२६ : सहा जागा बिनविरोध, ११ मतदारसंघांत रंगणार थेट लढत

मुंबई : विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या टप्प्यात महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. अनेक उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे राज्यातील १७ पैकी ६ मतदारसंघांमध्ये निवडणूक बिनविरोध झाली असून उर्वरित ११ मतदारसंघांत चुरशीच्या लढती पाहायला मिळणार आहेत.

वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार शैलेश अग्रवाल यांनी उमेदवारी मागे घेतल्याने भाजपचे अरुण लखानी यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. यापूर्वी यवतमाळ मतदारसंघात काँग्रेसचे साहेबराव कांबळे यांनीही माघार घेतली होती. त्याचबरोबर अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे शिवसेनेचे दुष्यन्त चतुर्वेदी यांचाही विधान परिषदेत बिनविरोध प्रवेश झाला आहे.

महायुतीने अनेक ठिकाणी बंडखोरी नियंत्रणात आणण्यात यश मिळवले असून त्यामुळे काही मतदारसंघांतील समीकरणे बदलली आहेत. अहिल्यानगरमध्ये काँग्रेसचे उमेदवार करण ससाणे यांनी माघार घेतली. तसेच अपक्ष दत्तात्रय पानसरे यांच्या उमेदवारीबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांच्या चर्चेनंतर पानसरे यांनीही माघार घेतली. परिणामी प्राजक्त तनपुरे यांची बिनविरोध निवड झाली.

दरम्यान, छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात शिवसेनेचे बंडखोर उमेदवार समीर सत्तार यांनी अर्ज मागे घेतल्याने भाजपला दिलासा मिळाला आहे. नांदेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे प्रवीण पाटील-चिखलीकर यांनीदेखील निवडणुकीतून माघार घेतली आहे.

प्रमुख मतदारसंघांतील लढती

  • नाशिक : गोकुळ गीते (अपक्ष) विरुद्ध नरेंद्र दराडे (शिवसेना)
  • सोलापूर : राजेंद्र राऊत (भाजप) विरुद्ध वसंतराव देशमुख (राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार गट)
  • जळगाव : नंदकिशोर महाजन (भाजप) विरुद्ध शरद तायडे (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) विरुद्ध रेश्मा काळे (बंडखोर)
  • सांगली-सातारा : धैर्यशील कदम (भाजप) विरुद्ध अभयसिंह जगताप (राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार गट) विरुद्ध किशोर धुमाळ (अपक्ष)
  • नांदेड : अमर राजुरकर (भाजप) विरुद्ध कृष्णा पाटील आष्टीकर (शिवसेना उबाठा) विरुद्ध प्रशांत इंगोले (अपक्ष)
  • भंडारा-गोंदिया : नरेश ईश्वरकर (काँग्रेस समर्थित) विरुद्ध अविनाश ब्राम्हणकर (भाजप)
  • अमरावती : हर्षदीप देशमुख (काँग्रेस) विरुद्ध प्रवीण पोटे (भाजप) विरुद्ध निलेश विश्वकर्मा (वंचित बहुजन आघाडी)
  • धाराशिव-लातूर-बीड : बसवराज पाटील (भाजप) विरुद्ध महेश देशमुख (काँग्रेस)
  • परभणी-हिंगोली : सईद खान (शिवसेना) विरुद्ध डॉ. विवेक नावंदर (शिवसेना उबाठा) विरुद्ध सुशील देशमुख (अपक्ष)
  • छत्रपती संभाजीनगर-जालना : सुहास शिरसाट (भाजप) विरुद्ध गणेश लोखंडे (शिवसेना उबाठा)
  • नागपूर पोटनिवडणूक : डॉ. राजीव पोतदार (भाजप) विरुद्ध अतुल लोंढे (काँग्रेस)

विधान परिषद निवडणुकीत सहा जागा बिनविरोध झाल्याने राजकीय पक्षांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असला, तरी उर्वरित ११ मतदारसंघांतील लढतींमध्ये महायुती, महाविकास आघाडी आणि अपक्ष उमेदवारांमध्ये प्रतिष्ठेची चुरस रंगणार आहे.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.