मोदी सरकारची तपपूर्ती; १२ वर्षांत विकासाला अभूतपूर्व चालना
विकासाची गती, जनतेचा विश्वास आणि जागतिक स्तरावर वाढलेला भारताचा गौरव – रक्षा खडसे
जळगाव : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने गेल्या १२ वर्षांत विकास, विश्वास आणि जनकल्याणाचा नवा आदर्श निर्माण केला असून, देशातील गरीब, शेतकरी, महिला, युवक आणि वंचित घटकांच्या सक्षमीकरणासाठी अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय युवा व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केले.
जळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे (राजूमामा), भाजपचे पश्चिम जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, महापौर दीपमाला काळे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख मनोज भांडारकर, विजय वानखेडे आदी उपस्थित होते.

रक्षा खडसे यांनी सांगितले की, मोदी सरकारने ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ या मंत्रानुसार काम करत जनतेचा विश्वास संपादन केला आहे. जनधन योजना, आयुष्मान भारत, प्रधानमंत्री आवास योजना, उज्ज्वला योजना, पीएम किसान सन्मान निधी, जल जीवन मिशन, स्वच्छ भारत अभियान, मुद्रा योजना आणि पीएम विश्वकर्मा यांसारख्या योजनांमुळे कोट्यवधी नागरिकांना थेट लाभ मिळाला आहे.
देशाच्या पायाभूत सुविधांमध्ये अभूतपूर्व वाढ झाल्याचे सांगताना त्यांनी राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे, वंदे भारत गाड्या, मेट्रो नेटवर्क, विमानतळ आणि डिजिटल कनेक्टिव्हिटी क्षेत्रातील प्रगतीची माहिती दिली. तसेच महिलांच्या सक्षमीकरणासाठी लखपती दीदी, सुकन्या समृद्धी योजनेसह विविध उपक्रम राबविण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
भारत आज जागतिक स्तरावर विश्वासार्ह आणि सक्षम राष्ट्र म्हणून उदयास आला असून, जी-२० अध्यक्षपद, ‘वसुधैव कुटुंबकम’चा संदेश आणि विविध आंतरराष्ट्रीय उपक्रमांमधून देशाची प्रतिष्ठा वाढल्याचेही त्यांनी सांगितले. मोदी सरकारची १२ वर्षांची कारकीर्द ही विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करणारी ठरली असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.