DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात इंटर्नशिप ओरिएंटेशनचा शुभारंभ

जळगाव : वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक ज्ञानाला व्यावसायिक अनुभवाची जोड देणारा महत्त्वाचा टप्पा म्हणजे इंटर्नशिप. याच पार्श्वभूमीवर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात इंटर्नशिप ओरिएंटेशन प्रोग्रॅमचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या हिवाळी २०२५ च्या अंतिम वर्ष एमबीबीएस परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाने ८४.५० टक्के निकालाची उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. अंतिम वर्षाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष रुग्णसेवा व वैद्यकीय कार्यपद्धतीचे ज्ञान मिळावे यासाठी एक वर्षाची अनिवार्य इंटर्नशिप पूर्ण करावी लागते. दि. १५ जून २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या इंटर्नशिप ओरिएंटेशन प्रोग्रॅमच्या उद्घाटनप्रसंगी महाविद्यालयाचे संस्थापक तथा माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके, रजिस्ट्रार प्रमोद भिरुड, कम्युनिटी मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉ. दिलीप ढेकळे, पीडियाट्रिक विभागाचे प्रमुख डॉ. अनंत बेंडाळे, इंटर्नशिप प्रोग्रॅमचे समन्वयक डॉ. निलेश बेंडाळे, डॉ. बडगुजर यांच्यासह प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके यांनी इंटर्नशिप कालावधीत विद्यार्थ्यांनी शिस्त, सेवा वृत्ती आणि रुग्णांप्रती संवेदनशीलता जपण्याचे आवाहन केले. संस्थापक अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांनी विद्यार्थ्यांना वैद्यकीय व्यवसायातील नैतिक मूल्ये, रुग्णसेवेचे महत्त्व आणि व्यावसायिक जबाबदार्‍या याविषयी मार्गदर्शन केले. या ओरिएंटेशन प्रोग्रॅममुळे विद्यार्थ्यांना आगामी इंटर्नशिप कालावधीतील जबाबदार्‍या, विविध विभागांतील कार्यपद्धती तसेच रुग्णसेवेचे प्रत्यक्ष प्रशिक्षण याबाबत सविस्तर माहिती मिळाली. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला..

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.