23 जूननंतर पावसाचा जोर वाढणार
मुंबई : राज्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांना दिलासा देणारा अंदाज व्यक्त केला आहे. यंदाचे वर्ष शेतकरी हिताचे राहणार असून दुष्काळ पडणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला असला तरी सध्या तो स्थिरावल्याने अनेक भागांत पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात पेरणीयोग्य पाऊस होईल आणि खरीप हंगामाला गती मिळेल, असे पंजाबराव डख यांनी सांगितले.

त्यांच्या अंदाजानुसार जून महिन्यात पावसाचे प्रमाण तुलनेने कमी राहील. मात्र जुलै महिन्यात चांगला पाऊस पडेल. ऑगस्टमध्ये पावसाचा जोर काहीसा कमी राहण्याची शक्यता असून सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात परतीचा पाऊस जोरदार हजेरी लावू शकतो.
कुठे आणि कधी होणार पाऊस?
पंजाबराव डख यांच्या अंदाजानुसार 18 जूननंतर पूर्व विदर्भात पावसाला सुरुवात होईल. त्यानंतर 20 ते 21 जूनदरम्यान मराठवाड्यात पाऊस पोहोचेल. मराठवाड्यात 21 ते 29 जूनदरम्यान विविध भागांत पावसाची शक्यता आहे.
विदर्भात 18 ते 19 जूनपासून पावसाचा जोर वाढेल. त्यानंतर हा पाऊस उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राकडे सरकेल. उत्तर महाराष्ट्र तसेच पश्चिम महाराष्ट्रात 23 ते 29 जूनदरम्यान चांगल्या पावसाची शक्यता त्यांनी वर्तविली आहे.
शेतकऱ्यांनी घाबरू नये
“दुष्काळ पडणार नाही. शेतकऱ्यांनी भीती बाळगू नये. 19 जूननंतर उन्हाची तीव्रता कमी होईल आणि वातावरणात ढगाळपणा वाढेल. जूनच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात चांगला पाऊस होईल,” असा विश्वास पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे.