तांबापुरा परिसरात मध्यरात्री दोन गट आमनेसामने; दगडफेकीने तणाव, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
जळगाव | जळगाव शहरातील तांबापुरा भागातील बिस्मिल्ला चौकात गुरुवारी मध्यरात्री दोन गटांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर दगडफेकीत झाल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेत दोन घरांचे नुकसान झाले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली.
प्राथमिक माहितीनुसार, एका महिला आणि तरुणामध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. काही वेळातच या वादाने उग्र स्वरूप धारण करत दोन गट एकमेकांसमोर उभे ठाकले. त्यानंतर दोन्ही बाजूंनी दगडफेक सुरू झाल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला.

दगडफेकीदरम्यान दोन घरांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र, परिस्थिती चिघळल्याने जमावाकडून पोलिसांच्या वाहनांवरही दगडफेक झाल्याचे सांगितले जात आहे.
घटनेची तीव्रता लक्षात घेऊन अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तातडीने मागविण्यात आला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवत परिसरात शांतता प्रस्थापित केली.
दरम्यान, या प्रकरणी दोन्ही गटांतील संबंधितांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात दंगलीचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत. सध्या बिस्मिल्ला चौक व तांबापुरा परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.