पोहण्याचा आनंद ठरला अखेरचा; पाण्याच्या खड्ड्यात बुडून तिघा मित्रांचा मृत्यू
अमळनेर : शहरातील चोपडा रोडवरील उड्डाण पुलाजवळ पावसाच्या पाण्याने भरलेल्या खोल खड्ड्यात बुडून तीन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या दुर्घटनेमुळे अमळनेर शहरासह परिसरात शोककळा पसरली आहे. प्राथमिक माहितीनुसार, अमळनेर येथील सिंधी कॉलनी परिसरातील तिघे मित्र पोहण्यासाठी उड्डाण पुलाजवळील पाण्याने भरलेल्या खड्ड्याकडे गेले होते. पोहत असताना ते खोल पाण्यात गेल्याने तिघेही बुडाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. नागरिकांच्या मदतीने तिघांनाही पाण्याबाहेर काढून तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर तिघांनाही मृत घोषित केले.

या दुर्घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. मृत मुलांमध्ये मानव रत्नाणी, दिनेश पंजवानी आणि कार्तिक उधवानी (सर्व रा. सिंधी कॉलनी, अमळनेर) यांचा समावेश आहे.
घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, पावसाळ्यात पाण्याने भरलेले खड्डे, तलाव आणि इतर धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे, तसेच पालकांनी मुलांवर विशेष लक्ष ठेवावे, असे आवाहन नागरिकांकडून करण्यात येत आहे.