DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी विद्यापीठाला निवेदन

जळगाव : पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या अधिछात्रवृत्ती तसेच नोंदणी प्रमाणपत्रासंदर्भातील अडचणी तातडीने सोडविण्याच्या मागणीसाठी भाजपा जळगाव महानगरचे जिल्हा चिटणीस भूषण लाडवंजारी यांच्या नेतृत्वाखाली पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्र-कुलगुरू मा. एस. टी. इंगळे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

महाज्योती, नागपूर व सारथी, पुणे यांच्या पीएच.डी. अधिछात्रवृत्तीच्या जाहिरातीतील विद्यार्थी निवड निकषांमुळे अनेक पात्र संशोधक विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. विशेषतः शैक्षणिक वर्ष २०२४ मध्ये पीएच.डी. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांच्या नोंदणी प्रमाणपत्रावर असलेला ‘Provisional’ हा शब्द वगळून नियमित Registration Certificate देण्यात यावे, अशी प्रमुख मागणी करण्यात आली.

तसेच अधिछात्रवृत्तीसाठी निश्चित करण्यात आलेली १०० विद्यार्थ्यांची संख्या वाढवून किमान ५०० पात्र विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्तीचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. यासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने महाज्योती, नागपूर व सारथी, पुणे यांच्याकडे स्वतंत्र शिफारसपत्र पाठवून पात्र विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी ठोस पाठपुरावा करावा, अशी विनंती करण्यात आली.

अधिछात्रवृत्तीच्या नवीन निकषांबाबतही विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या मांडण्यात आल्या. यामध्ये पदव्युत्तर पदवीमध्ये किमान ‘B+’ ग्रेडची अट, वयोमर्यादा तसेच NET, SET आणि PET या पात्रतांचा टप्प्याटप्प्याने विचार करण्याच्या निकषांमुळे अनेक विद्यार्थ्यांना संधीपासून वंचित राहण्याची शक्यता असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. त्यामुळे वयोमर्यादा पूर्वीप्रमाणे ४५ वर्षे ठेवावी तसेच NET, SET आणि PET या तिन्ही पात्रतांना समान संधी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

पदव्युत्तर पदवीमध्ये ‘B’ +ग्रेडची अट शिथिल करून पूर्वीप्रमाणे नियम लागू करण्यात यावेत, जेणेकरून अधिकाधिक पात्र विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्तीचा लाभ मिळू शकेल, अशी मागणीही करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांना उपलब्ध असलेल्या घरभाडे भत्ता, आकस्मिक खर्च आदी सुविधांमध्ये यावेळी करण्यात आलेली कपात पुनर्विचार करून विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणे अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली.

विद्यापीठ स्तरावरील अडचणी तातडीने दूर करून विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत संबंधित संस्थांकडे सकारात्मक शिफारस करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी भाजपा जळगाव महानगरचे जिल्हा चिटणीस भूषण लाडवंजारी, तसेच पीएच.डी. संशोधक विद्यार्थी अनिल ज्ञानेश्वर हाडे, ॲड. राहुल वाकलकर, अनिल बाविस्कर, शिरीष तायडे, भूषण सोनवणे, भरत पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना भूषण लाडवंजारी यांनी राज्यातील पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांनी आपल्या जिल्ह्यातील आमदार, खासदार, मंत्री तसेच महाज्योती व सारथीच्या संबंधित कार्यालयांकडे निवेदने सादर करून अधिछात्रवृत्तीचा लाभ जास्तीत जास्त पात्र विद्यार्थ्यांना मिळावा यासाठी पाठपुरावा करण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांच्या मागण्या मुख्यमंत्री महोदयांपर्यंत पोहोचविण्यासाठीही प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आता केवळ १३ दिवसांचा कालावधी शिल्लक असल्याने विद्यार्थ्यांच्या अडचणींचा तातडीने विचार करून संबंधित यंत्रणांनी सकारात्मक निर्णय घ्यावा, असे आवाहनही लाडवंजारी यांनी केले. राज्यातील पात्र व गरजू पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्तीचा लाभ मिळावा, यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.