DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

युवतींच्या दहीहंडी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सीमा पाटील

कार्याध्यक्षपदी डॉ. सोनाली महाजन; उपाध्यक्षपदी उषा जैन, स्वागत समिती प्रमुखपदी डॉ. कल्याणी नागूलकर

जळगाव : भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ रोजी शिवतीर्थ मैदान येथे युवतींच्या दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या उत्सवाचे १८ वे वर्ष असून, दहीहंडी फोडणाऱ्या विजेत्या संघांना रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत.

प्रथम क्रमांकाच्या विजेत्या संघाला ३१ हजार १११ रुपये, द्वितीय क्रमांकाच्या संघाला २१ हजार १११ रुपये, तर तृतीय क्रमांकाच्या संघाला ११ हजार १११ रुपये रोख पारितोषिक देण्यात येणार आहे.

पुरुषांप्रमाणेच युवतींचा सहभाग दहीहंडीसारख्या मोठ्या उत्सवात वाढावा आणि त्यांना आपले कौशल्य सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने युवतींची दहीहंडी सुरू करण्यात आली आहे. मानवी मनोरे बनविण्याच्या या क्रीडा प्रकाराला महाराष्ट्र शासनाने साहसी खेळाचा दर्जा दिला आहे. संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात युवतींची दहीहंडी आयोजित करणारा हा एकमेव उपक्रम असल्याचे आयोजकांनी सांगितले.

उत्सव समितीची कार्यकारिणी जाहीर
युवतींच्या दहीहंडी उत्सवासाठी समिती गठीत करण्यात आली असून अध्यक्षपदी डॉ. सीमा पाटील, कार्याध्यक्षपदी डॉ. सोनाली महाजन, उपाध्यक्षपदी उषा जैन, स्वागत समिती प्रमुखपदी डॉ. कल्याणी नागूलकर आणि सचिवपदी प्रा. क्षमा सराफ यांची निवड करण्यात आली आहे. खजिनदारपदी निलम जोशी यांची निवड करण्यात आली असून स्वागत समिती सदस्य म्हणून रूपाली वाघ, तर सदस्य म्हणून डॉ. अनिता पाटील, हर्षाली चौधरी, नेहा जोशी, सोनाली पाटील, लेफ्टनंट डॉ. हेमाक्षी वानखेडे, संध्या कांकरिया आणि मिनल जैन यांचा समावेश आहे. नवीन कार्यकारिणीच्या वतीने ‘ठेवूया संस्कृतीची जाण, वाढवू आपल्या उत्सवाची शान’ या टॅगलाईनच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले.

युवतींच्या उत्साहाला प्रोत्साहन देणे सामूहिक जबाबदारी

“युवतींनी युवतींसाठी आयोजित केलेली दहीहंडी हा अत्यंत कौतुकास्पद आणि प्रेरणादायी उपक्रम आहे. महिलांनी पुढाकार घेऊन महिलांसाठी व्यासपीठ निर्माण करणे ही निश्चितच सकारात्मक बाब आहे. त्यांच्या या उत्साहाला प्रोत्साहन देणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. अशा उपक्रमांमधून युवतींच्या आत्मविश्वासाला बळ मिळते आणि समाजात महिला नेतृत्वाची नवी दिशा निर्माण होते.”
— अशोक जैन, अध्यक्ष, जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.