रक्षाबंधनाआधीच काळाचा घाला; तलावात बुडून बापलेकाचा करुण अंत
अमळनेर : रक्षाबंधनाच्या सणाच्या तोंडावर जळगाव जिल्ह्यातील दोन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला. अमळनेर तालुक्यातील खवशी येथे तलावात बुडून बापलेकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. मुलाला वाचविण्यासाठी वडिलांनी तलावात उडी घेतली; मात्र तलावातील गाळात दोघेही अडकल्याने त्यांचा करुण अंत झाला. ही घटना गुरुवारी सकाळी साडेसात ते आठ वाजेच्या सुमारास घडली.
मृतांमध्ये अण्णा एकनाथ तलवारे (३२) आणि त्यांचा मुलगा वीरेंद्र ऊर्फ विरू अण्णा तलवारे (७) यांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विरू सकाळी तलावाच्या परिसरात खेळत होता. खेळता खेळता तो तलावाच्या पाण्यात उतरला. मुलगा पाण्यात गेल्याचे लक्षात येताच त्याचे वडील अण्णा तलवारे यांनी त्याला वाचविण्यासाठी तत्काळ तलावात उडी घेतली. मात्र, तलावाच्या तळाशी मोठ्या प्रमाणात गाळ असल्याने दोघेही त्यात अडकले. त्यातून बाहेर पडता न आल्याने दोघांचा बुडून मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी तलावाकडे धाव घेतली. या घटनेमुळे तलावातील मोठ्या प्रमाणावरील गाळ तसेच सुरक्षिततेच्या उपाययोजनांचा अभाव याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.
अण्णा तलवारे आणि त्यांचा मुलगा विरू हे मूळचे आर्वी (ता. जि. धुळे) येथील रहिवासी होते. उदरनिर्वाहासाठी ते काही काळापासून अण्णा यांच्या सासरी असलेल्या खवशी येथे वास्तव्यास होते. बापलेकाच्या अकाली मृत्यूने तलवारे कुटुंबावर शोककळा पसरली असून, परिसरातही हळहळ व्यक्त होत आहे.